लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्याविरोधात ठाणे पोलिसांनी नोटीस काढली आहे. त्यांना ठाणे आयुक्तालय क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंधित करण्यात आले असून १ मे पर्यंत हे आदेश लागू असतील. काही दिवसांपूर्वीच ठाणे आणि कल्याणमध्ये राजुल पटेल यांनी त्यांच्या भाषणात शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी हे आदेश काढले आहे.
आणखी वाचा- “आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ…”, राज ठाकरेंचं सूचक विधान
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाणे आणि कल्याणमध्ये शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राजुल पटेल उपस्थित होत्या. त्यांनी भाषणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे शिंदे समर्थकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे राजुल पटेल यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा आणि कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी वाचा- “‘ब्लू फिल्म’ काढली असती तर बरं झालं असतं, यांनी…”, राज ठाकरेंची जोरदार टोलेबाजी
गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ अंतर्गत नोटीस बजावली आहे. ज्यावेळी ठाणे पोलिसांकडून चौकशीकरिता बोलावले जाईल. त्यावेळेस त्यांना हजर राहावे लागणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच ठाणे आयुक्तालय क्षेत्रात प्रवेश करण्यासही १ मे पर्यंत प्रतिबंधित करण्यात आल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असेही म्हटले आहे.