कल्याण – गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव काळात नेहमीच इतिहासकालीन घटनांशी विद्यमान वास्तव सामाजिक, राजकीय भूमिका जोडून चित्ररथ, गणेशोत्सवातील देखावे उभारण्यात माहीर असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांनी शिवजयंतीनिमित्त आपल्या संकल्पनेतून तयार केलेल्या शिवशाही-ठोकशाही चित्ररथाला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हरकत घेतली आहे.
वाहनावर सज्ज केलेला शिवशाही-ठोकशाहीचा देखावा पहिले काढून टाका, मगच चित्ररथ शहरात फिरवा, असे आर्जव सकाळपासून पोलिसांनी जिल्हाध्यक्ष साळवी यांना सुरू केले आहे. राजकीय दबावातून सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचे विजय साळवी यांनी सांगितले. कल्याणमधील विजय साळवी हे शिवसेनेचे बलस्थान मानले जाते. यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत कोठेही ते फिरत नसले तरी पडद्यामागून मोठी उलथापालथ करण्याची ताकद साळवी यांच्यात आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर साळवी यांनी शिंदे गटात दाखल व्हावे, मागील दीड वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी विविध प्रकारचे पोलिसी आणि इतर दबाव आणून साळवी यांनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून प्रयत्न केले. पण शिवसेनाप्रमुख, जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नितीमुल्यांचे सेवक असल्याने साळवी यांनी शिंदे गटात सामील होणे पसंत केले नाही.
हेही वाचा – अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर
साळवी यांना तडीपार करणे, त्यांच्यावर पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करणे, असे अनेक प्रकार गेल्या दीड वर्षात कल्याणमध्ये झाले आहेत. त्याला कायदेशीर मार्गाने साळवी यांनी उत्तर देऊन शिंदे गटासमोर मान तुकवणे झिडकारले आहे.
हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
साळवी यांच्या प्रत्येक हालचालींवर राजकीय दबावातून पोलीस हालचाली ठेऊन आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवात साळवी यांनी त्यांच्या रामबाग विभागात शिवसेनेतील फुटीरता विषय घेऊन उभारलेला गणेशोत्सवाच्या देखाव्याला पोलिसांनी हरकत घेऊन तो देखावा साळवी यांना काढून टाकण्यास सांगितले होते. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर काही अटींवर आक्षेपार्ह विषय काढून तो देखावा साळवी यांनी भक्तांसाठी खुला केला होता.
शिवशाही-ठोकशाही
शिवजयंतीनिमित्त साळवी यांच्या संकल्पनेतून शिवशाही-ठोकशाही विषयावरील चित्ररथ कार्यकर्त्यांनी सजविला. गुरुवारी या चित्ररथाच्या माध्यमातून मिरवणूक काढण्याची तयारी करण्यात आली होती. ही माहिती गोपनीय पोलिसांच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा विषय गेला. या चित्ररथातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेतील आताच्या ठोकशाहीला लक्ष्य करण्यात आल्याने राजकीय दबाव वाढल्याने पोलिसांनी साळवी यांच्या चित्ररथावरील आक्षेप घेतला आहे. गुरुवारी दुपारपासून पोलीस साळवी यांच्या घराजवळ तळ ठोकून आहेत. लोकसभेची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे घटनास्थळी आचारसंहिता अधिकारी दाखल झाले. त्यांनीही संबंधित चित्ररथावरील ठोकशाहीचे चित्र काढून टाकण्याची सूचना केली आहे.
आपण इतिहासकालीन घटनेवर आधारित चित्ररथ तयार केला आहे. राज्य सत्ताधारी प्रमुखांना चित्ररथावरील मजकूर सहन होत नसल्याने पोलिसांवर दबाव आणून आपणास त्रास देण्याचे काम सुरू आहे. आपण चुकीचे काही केले असेल तर पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल करावा. – विजय साळवी, जिल्हाध्यक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.