मुंब्रा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश लाहीगुडे (५२) यांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकारामुळे पोलीस दलातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा- केंद्राकडून मदत मिळूनही करोना काळात राज्यातील काही भागात अनियमितता
तक्रारदार हे मुंब्रा भागात राहत असून त्यांच्याविरोधात एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी रमेश लाहीगुडे यांनी त्यांच्याकडून ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, शुक्रवारी विभागाने प्रकरणाची पडताळणी केली असता, रमेश यांनी त्यांच्याकडून तडजोडीअंती ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सोमवारी विभागाने मुंब्रा पोलीस ठाण्यात सापळा रचून रमेश लाहीगुडे यांना लाच घेताना ताब्यात घेतले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.