डोंबिवली- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शनिवारी कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखेला भेट दिली.
शाखेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. शाखे बाहेर कोणतीही घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. उल्हासनगर येथे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय काही शिवसैनिकांनी फोडल्याने ते लोण इतरत्र पसरू नये. याची विशेष खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. डोंबिवली मध्यवर्ति शाखा हे शिवसेनेचे शहरातील बलस्थान आहे.
शिवसैनिकांनी शांतता पाळावी. कुठलाही अनुचित प्रकार घडत असेल तर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू करावी, अशा सूचना उपायुक्त गुंजाळ यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या. कल्याण डोंबिवली शहर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्रीची नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. परवानाधारी शस्त्र तपासणीचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पाहणीच्यावेळी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर उपस्थित होते.
डोंबिवली परिसरातील खासदार शिंदे यांच्या कार्यालयांबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.