भिवंडी येथील पडघा भागात वाहन चालकावरील कारवाई टाळण्यासाठी तसेच त्याचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मासिक ३० हजार रुपयांची लाच मागणारा पडघा पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक भरत जगदाळे (४०) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>> ठाण्यात जलमापकधारकांना वाढीव देयके ; पालिकेकडे तक्रारी वाढू लागल्या
तक्रारदार हे चार चाकी वाहन चालक असून ते पडघा येथून नाशिक, मालेगाव, ठाणे, पुणे या भागातील प्रवाशांना घेऊन जात असतात. बुधवारी त्यांना पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भरत जगदाळे यांनी अडविले. कारवाई टाळण्यासाठी तसेच त्यांचा हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडून जगदाळे याने मासिक ३० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, या घटनेनंतर वाहन चालकाने ठाण्यातील एसीबी कार्यालय गाठले. तक्रारदाखल केल्यानंतर एसीबीच्या पथकाने तळवली नाका येथील पोलीस चौकीजवळ सापळा रचून जगदाळेला २० हजार रुपयांची लाच घेताना हातोहात पकडले. जगदाळे विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.