कल्याण – उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलीस ठाणे हद्दीतील पेनिसुला ऑर्केस्ट्रा बारवर सोमवारी रात्री उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून २४ व्यावसायिक महिला, सात ग्राहक आणि बारचे व्यवस्थापक, रोखपाल, सेवक अशा एकूण ३७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ११ हजाराची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली, अशी माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.

उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी सांगितले, उल्हासनगर कॅम्प पाच मधील साई मार्केट परिसरातील हिललाईन पोलीस ठाणे हद्दीतील पेनिसुला ऑर्केस्ट्रा बार रात्री उशिरापर्यंत चालविला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वरिष्ठांकडे आल्या होत्या. या तक्रारींची खात्री केल्यानंतर पेनिसुला बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याच्या आणि या बारमध्ये महिला व्यावसायिक आणून त्यांना ग्राहकांसमोर अश्लिल हावभाव, अंगविक्षेप करून, तंग वस्त्रप्रावरणे करून नाचविले जात असल्याचे आणि ग्राहक या महिला सेविकांवर पैसे उधळत असल्याच्या वाढत्या तक्रारी आल्या होत्या. बारमधील वाद्यांचा मोठा आवाज येत असल्याने परिसरातील रहिवासी या नियमितच्या त्रासाने हैराण होते.

या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी आणि पोलीस पथकाने अचानक पेनिसुला बारमध्ये प्रवेश केला. छापा पडल्याचे समजताच महिला व्यावसायिक, ग्राहक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पोलिसांनी त्यांना आहे त्या जागीच बसून राहण्याच्या सूचना केल्या. कोणी पळून गेल्यास कठोर कारवाई करण्याची सूचना केली.

पोलिसांनी पहिले मोठ्या आवाजात वाजविला जाणारा वाद्यवृंद ताब्यात घेतला. त्यानंतर वाद्यवृंद करणारे कर्मचारी, २४ महिला व्यावसायिक, सात ग्राहक, व्यवस्थापक, रोखपाल आणि दोन सेवक असे एकूण ३७ जण पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये कल्याण डोंंबिवली पालिकेतील एक ५६ वर्षाचा अधिकारी असल्याचे पोलीस पथकाला आढळले. त्या अधिकाऱ्याचेही नाव पथकाने हिललाईन पोलीस ठाण्यातील तक्रारीत नोंद केले असल्याचे समजते. एका छापा पथकातील अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला.

हवालदार राजेंद्र थोरवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, मंगेश जाधव, अमर कदम, चंद्रकांत सावंत, योगेश वाघ, रितेश वंजारी, रामदास उगले, संजय शेरमाले, मनोरमा सावळे यांनी भाग घेतला. कोणीही सरकारी सेवेतील कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी मादक पेय किंवा मादक औषधद्रव्यांचे सेवन करत असेल आणि तसे तपासात निष्पन्न झाले तर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाने त्या पालिका कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई होऊ शकते, असे पालिकेतील एका जाणकार अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेचा पालिकेचा कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.