घोडबंदर येथील कासारवडवली भागात असलेल्या ‘जालजा हेरिटेज लॉज’वर ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने मंगळवारी छापा टाकला. यात तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी लॉजचा व्यवस्थापक दानीचंद ठाकूर आणि वेटर लक्षधर कलिता या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर दिनेश यादव ऊर्फ पिंटू याचा शोध पोलीस घेत आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना जालसा लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी त्यांनी अनैतिक मानवी वाहतूकविरोधी शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.
रिक्षाचालकास अटक
ठाणे : एमडीची विक्री करणारा रिक्षाचालक रफिक हनिफ खान (२४) यास अटक केली आहे. मुंब्रा परिसरात रफिक खान राहतो. मंगळवारी दुपारी तो कळवा रिक्षा स्थानकात एमडीची पावडर विक्री करीत असताना पोलिसांना आढळून आला. दरम्यान, आंबिवली फाटय़ाजवळ एका महिलेच्या हातातील मोबाइल मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने खेचून नेल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातील  पाचपाखाडी येथे मंगळवारी अशीच घटना घडली. मखमली तलाव परिसरात मयूर शहा (२४) लुईसवाडी भागातून पायी जात होता.
या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाइल खेचून नेला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader