ठाणे : शहापूर मोबाईल, दुचाकी किंवा दागिने या सारख्या वस्तू प्रवासात गहाळ होतात किंवा चोरीला जातात. या वस्तू पुन्हा मिळविणे कठीण जाते. असे असले तरी नागरिक पोलीस ठाण्यामध्ये फक्त आशेच्या आधारावर तक्रार दाखल करत असतो. परंतु त्याच वस्तू पुन्हा जशाच्या तशा स्वरुपात मिळाली तर? आश्चर्याचा धक्का कोणालाही बसेल. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हरविवेल्या चार कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नागरिकांना पुन्हा दिला आहे. यामध्ये सोने-चांदीचे दागिने, रोकड, दुचाकी, मोबाईल यांसारख्या वस्तूंचा सामावेश आहे. तर ठाणे शहरातील नौपाडा पोलिसांनी २०२२ ते २०२५ पर्यंत चोरीला गेलेले १०८ मोबाईल तक्रारदारांना परत मिळवून दिले आहेत. वस्तू परत मिळताच, अनेकजण भावनिक झाले होते.

एखादी वस्तू खरेदी करताना व्यक्ती पैसे जोडून ती खरेदी करतात. परंतु चोरट्यांकडून ही वस्तू चोरी केली जाते किंवा हरविते. त्यानंतर सर्वच अडचणी सामना त्या व्यक्तीला सहन करावा लागतो. वस्तू गहाळ किंवा चोरीला गेल्यास व्यक्तीला मानसिक ताण देखील सहन करावा लागतो. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही वस्तूचा शोध लागेल की नाही हा प्रश्न उभा असतो. परंतु ठाणे ग्रामीण पोलिसांनी विशेष कौशल्य वापरुन विविध चोरीची प्रकरणे उघडकीस आणून तब्बल चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आला. शहापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हा हस्तांतरण सोहळा पार पडला.

ठाणे ग्रामीण पोलिसांनी विविध तपास पथके तयार करुन सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार यांच्या आधारे मुदतीत तपास करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्या गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन एकुण चार कोटी सहा लाख ९२ हजार ८३९ रुपये किंमतीचे सोने, चांदी, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी यांसह अनेक मौल्यवान वस्तूंचा मुद्देमाल जप्त केला. यात ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस.स्वामी, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे, गणेशपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे, मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे यांसह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

तर ठाणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात २०२२ ते २०२५ या कालावधीत गहाळ झालेले १०८ मोबाईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले. मोबाईल मिळताच अनेकांनी समाधान व्यक्त केले.