डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील शिळ गावातील एका जागरूक नागरिकाच्या सतकर्तमुळे आणि मानपाडा पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे शनिवारी सकाळी साडे सात वाजता गोळवली गावा जवळ जनावारांच्या मांसाची बेकायदा तस्करी करणारी दोन वाहने पोलिसांनी जप्त केली. या वाहनांमधून पोलिसांनी चार लाखाचे जनावारांचे मांस जप्त केले. या दोन्ही वाहनांमधील चालक पोलिसांना पाहून पळून गेले.
हेही वाचा >>> कल्याण: दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल अर्धा तास उशिरा
पोलिसांनी चार लाखाच्या मांसासह सात लाखाची दोन वाहने असा एकूण ११ लाखाची सामग्री जप्त केली आहे. ही सामग्री मानपाडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. शिळ गावातील हितेश वास्कर (२४) या तरूणाला एका टेम्पोतून जनावारांच्या मांसाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. हा टेम्पो शिळफाटा भागातून कल्याण दिशेने जाणार होता. त्याने ही माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पोलीस ईश्वर सोनावणे, प्रभाकर जंगेवाड यांना दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, हवालदार सोनावणे, जंगेवाड आणि जागरूक नागरिक हितेश वास्कर, रोहन भंडारी,सुनील पाटील, जगदीश फुलोरे यांनी टेम्पो पकडण्यासाठी शिळफाटा रस्त्यावरील गोळवली गावा जवळील तनिष्का बार जवळ सापळा लावला.
हेही वाचा >>> ठाणे : वृद्धेची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
ठरल्या वेळेत शनिवारी सकाळी जनावारांचे मांस असलेला एक टेम्पो, त्याच्या पाठीमागे एक स्विफ्ट कार कल्याण दिशेने जात होती. त्यावेळी माहितगार हितेश याने पोलिसांना संबंधित वाहनातून मांस नेण्यात येत असल्याची माहिती इशाऱ्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी ती वाहने अडविण्याची तयारी केली. पोलीस समोर असल्याचे पाहून टेम्पो चालकाने १०० मीटर अगोदरच टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला. त्याच्या पाठोपाठ स्वीफ्ट कार चालकाने वाहन कडेला घेतले. दोन्ही वाहने तेथेच सोडून दोन्ही वाहनांचे चालक आणि त्यांचे सहकारी परिसरात पळून गेले. पोलिसांनी तात्काळ दोन्ही वाहनांच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत चालक पळून गेले होते. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. त्यात जनावारांचे मांस आढळून आले. या मांसाची बाजारातील किंमत सुमारे चार लाख रूपये आहे.
हे मांस कोणत्या जनावारांचे आहे हे तपासण्यासाठी पोलिसांनी कल्याणच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. हवालदार ईश्वर सोनावणे यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात टेम्पो चालक, मोटार चालक आणि त्यांचे सहकारी यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या वाहनांच्या क्रमांकावरून पोलिसांनी त्यांच्या मालकांचा शोध सुरू केला आहे.