छाप्यानंतर साथीदार समजून आरोपींनी गाडीत कोंबले

मीरा रोड येथे आरोपींनी चक्क पोलीस शिपायाचेच अपहरण केल्याची घटना घडली आहे. जुगाराच्या अड्डय़ावर पोलिसांनी छापा घातल्यानंतर तेथून पळून जाताना या आरोपींनी आपलाच साथीदार असल्याचे समजून पोलीस शिपायालाच आपल्या गाडीत घालून पळवून नेले. पोलिसांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केल्याच्या आरोपावरून चौघा जणांना अटक केली आहे.

गेल्या आठवडय़ात शनिवारी रात्री पोलिसांनी मीरा रोड येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत चालणाऱ्या जुगाराच्या अड्डय़ावर छापा घातला. या वेळी पोलिसांनी २१ जणांना अटक केली होती. मात्र, सुकेश कोटियन, सूरज शेट्टी, अरुण शेट्टी व अण्णा इंगळे हे चौघे जण या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी ठरले. आपल्या गाडीत बसून पळण्याच्या तयारीत असताना पाठीमागून आणखी एक जण पळत येताना त्यांना दिसला. चौघांना तो आपलाच कोणी तरी साथीदार असल्याचे वाटल्याने त्यांनी त्याला पकडून आपल्या गाडीत घातले व तेथून पळून गेले.  आपले नाव देवचंद जाधव असून, भाईंदर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे सांगताच या चौघांच्या पायाखालची जमीनच सरकली. जाधव यांनी आरोपींना गाडी पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. आरोपींनी गाडी थांबवली व जाधव  खाली उतरताच तेथून पोबारा केला. त्यानंतर आरोपींना अटक झाली.

Story img Loader