पोलीस पत्नीच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून कारवाई

वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची ३० गुंठे जागा हडप करण्याचे षड्यंत्र एका पोलीस पत्नीच्या सतर्कतेने उधळले गेले आहे. या पोलीस ठाण्याच्या जागेचा बनावट नकाशा बनवून त्यातील ३० गुंठे जागा बेपत्ता करण्यात आली होती. मात्र सुकेशिनी कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने थेट पंतप्रधानांपर्यंत तक्रार केल्यानंतर प्रशासन हादरले. नव्याने मोजणी करून संपूर्ण १ हेक्टर ८४ गुंठे जागा पोलीस ठाण्याला परत मिळाली आहे.

वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची १ हेक्टर ८४ गुंठे एवढी जागा आहे. त्या जागेवर पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी वसाहत आहे. उर्वरित मोक्याची जागा मोकळी होती. ही मोकळी जागा हडप करण्याचा डाव बिल्डरांनी रचला होता. त्यासाठी वसई पोलीस ठाण्याचा खासगी सव्‍‌र्हेअरमार्फत दुसरा बनावट नकाशा तयार करण्यात आला होता. या नकाशातून ३० गुंठे जागा बेपत्ता करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’ने प्रसिद्ध केले होते.

पोलीस कर्मचारी शशिकांत कांबळे यांच्या पत्नी सुकेशिनी कांबळे यांना ही माहिती मिळताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातून मूळ नकाशा मिळवला आणि जागा हडप करण्याचे षड्यंत्र समोर आले. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांपासून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत तक्रार केली.

या तक्रारीमुळे पोलीस अधिकारी वर्ग हादरला. त्यांनी तात्काळ भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागेची मोजणी केली. या मोजणीनुसार वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची सर्वच्या सर्व म्हणजे १ हेक्टर ८४ गुंठे जागा परत मिळाली आहे. आम्ही जागेचे नव्याने सर्वेक्षण केले असून सर्व जागा आमची असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही जागेवर खासगी रस्ता आणि अतिक्रमण झालेले आहे ते आम्ही काढून टाकू, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.

नकाशाचे गूढ कायम

वसई पोलीस ठाण्याचा दुसरा नकाशा काळे अ‍ॅण्ड असोसिएटने बनवला होता. एका बिल्डराच्या सांगण्यावरून हा नकाशा बनविल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलीस ठाण्यातून जुना नकाशा कुणी न्यायला सांगितला, नवीन नकाशा बनविण्याचे आदेश कुणी दिले याबाबत पोलिसांनी मौन बाळगले आहे. माहिती अधिकारातही याचे उत्तर निरंक असेच देण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातून सरकारी दस्तावेज बाहेर नेण्यास तसेच दुसरा नकाशा बनविण्यास मदत करणारे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे. सरकारी नकाशा असताना दुसरा बनावट नकाशा का बनवला, त्याच्याशी संबंधित सर्वावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादीची चौकशीची मागणी

वसई पोलीस ठाण्यातील सरकारी जागा हडप करण्याचे प्रकरण गंभीर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. नवीन सर्वेक्षणानंतर मूळ जागा परत मिळाली असली तरी जागा हडप करण्याचे षड्यंत्र रचले गेले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली असून विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.