ठाणे शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदानात आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला जाताना ठाण्यातील शिवसैनिकांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला असून याच मुद्द्यावरून ठाण्यात सरकारच्या पाठींब्याने शिवसैनिकांवर पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी येत्या आठ दिवसात मोर्चा, उपोषण किंवा ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाणे : दिवाळीत ॲानलाईन खरेदी करताना सावधान

शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदानात ५६ व्या दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला जाताना ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी वाजत गाजत मिरवणूक काढली होती. जांभळी नाका ते ठाणे रेल्वे स्थानक अशी ही मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. याच संदर्भात शिवसेना (ठाकरे गट) ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि जिल्हा प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईचा निषेध नोंदविला.

हेही वाचा >>>डोंबिवली : ठाकुर्लीमध्ये वृध्देची लूट

दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी ठाण्यातील अबाल, वृद्ध, तरुण शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने मासुंदा तलाव येथील रंगो बापुजी गुप्ते चौकात जमले होते. तेथून ते मिरवणुकीने वाजत गाजत अत्यंत शांतपणे कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन ठाणे रेल्वे स्थानक येथे गेले. या मिरवणुकीची पूर्व कल्पना संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. तरी सुद्धा पोलिसांनी शंकर गणपत शिंदे ( ७७) आणि प्रदीप मनोहर शिंदे (६२ ) या वयोवृद्ध शिवसैनिकांबरोबरच २० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना नोटीसा दिल्या आहेत. ठाण्यात सरकारच्या पाठींब्याने शिवसैनिकांवर पोलिसांची दडपशाही सुरू आहे, असा आरोप कारखानीस यांनी केला. या कारवाईचा निषेध करण्यासाठी येत्या आठ दिवसात रणनीती ठरवून खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा, उपोषण किंवा ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरारा मेळाव्यात काही आक्षेपार्ह घोषणा दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु जे काही बोलत नव्हते, त्यांनाही नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. अनेक असे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, त्यांना आता पदे मिळाली असून ते पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांना मुद्दाम नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्याबाबत आम्ही आंदोलन करणार आहोत, असे केदार यांनी संगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police suppression of shiv sena worker in thane with the support of the government amy