मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे आपल्या कामात व्यस्त होते. अचानक त्यांचा मोबाइल वाजला. त्यांच्या विश्वासू खबऱ्याचा तो फोन होता. शहरात बनावट क्रमांकाच्या रिक्षा परिसरातील विशिष्ट मार्गावर चालवल्या जातात. त्यांना ‘नल्ला’ रिक्षा असे म्हणतात, अशी माहिती खबऱ्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली होती. पोलीस ठाण्यातील पहिल्या कारवाईची सूत्रे हलली.
घेवारे यांनी पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्याशी चर्चा करून ‘नल्ला’ रिक्षांसाठी सापळा रचला. यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडके, सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार आणि भरत शेळकेयांनीही मार्गदर्शन केले. त्याआधारे त्यांनी व्यूहरचना आखली आणि रिक्षा शोध मोहिमेला सुरुवात केली. गावदेवी ते लोकमान्यनगर या मार्गावर ‘शेअर’ तत्त्वावर या रिक्षा धावत होत्या. यामुळे गावदेवी परिसरात चार तर लोकमान्यनगर परिसरात पाच अशा नऊ कर्मचाऱ्यांनी मिळून सापळा रचला.
खबऱ्याने काही रिक्षांचे क्रमांक घेवारे यांना दिले होते. यामुळे पथक या दोन्ही भागांत येणाऱ्या रिक्षांच्या क्रमांक पाहत होते. त्या रिक्षाचे क्रमांक दिसताच कर्मचारी रिक्षात बसायचे आणि घोडबंदर किंवा लांबचा परिसर सांगायचे. लांबच्या भाडय़ामुळे रिक्षाचालक लगेच तयार व्हायचे. थोडय़ा अंतरावर रिक्षा जाताच कर्मचारी पोलीस असल्याची ओळख सांगायचे आणि रिक्षा मध्यवर्ती कार्यालयाच्या दिशेने वळवायचे. अशा प्रकारे पाच रिक्षा पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. एकाही चालकाकडे रिक्षाची कागदपत्रे नव्हती. खरे तर १६ वर्षांनी रिक्षाचे आयुर्मान संपते. अशा रिक्षा परिवहन विभाग बाद करते. रिक्षाच्या हॅन्डलजवळ चेसी क्रमांकाचा पत्रा असतो. रिक्षाचा पुन्हा वापर होऊ नये, म्हणून आरटीओ चेसी क्रमांकाचा पत्रा कापते. याआधी अशी पद्धत होती; परंतु आता रिक्षाचे १२ ते १३ तुकडे करण्यात येतात. आधीच्या परिवहन विभागाच्या पद्धतीमुळे वाचलेल्या रिक्षा आजही धावत आहेत. या रिक्षांना बनावट चेसी क्रमांक लावण्यात आले आहेत. आरटीओच्या कारवाईनंतर कापलेल्या पत्र्याइतका तुकडा घेऊन त्यावर बनावट क्रमांक छापला जातो आणि तो तुकडा कापलेल्या पत्र्याच्या जागेवर चिकटविला जातो. इंजिन क्रमांकाची प्लेट दगडाने ठेचून खराब केली जाते. मग, बनावट क्रमांक देऊन रिक्षा रस्त्यावर धावतात. दररोज ३०० रुपये इतके भाडे रिक्षाचालकांना मिळते.
नीलेश पानमंद
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा