ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीच्या डब्यात प्रवेश करत असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशाच्या खिशातील ८० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कल्याण वेलाप्पु (२१) असे अटकेत असलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली येथे राहणारे ३५ वर्षीय प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकातून मंगळवारी सायंकाळी प्रवास करत होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ते स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथे उभे असताना डोंबिवली रेल्वेगाडी आली. ते रेल्वेगाडीच्या डब्यात प्रवेश करत असताना गर्दी होती. त्याचवेळी कल्याण वेलाप्पु याने गर्दीचा गैरफायदा घेत त्यांच्या पँटच्या खिशातील ८० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. मोबाईल चोरल्यानंतर कल्याण वेलाप्पु पळून जाऊ लागला. आपला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशाने आरडा-ओरड करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी फलाटावर तैनात असलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी कल्याण वेलाप्पु याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा >>>कल्याणमधील वालधुनी येथील रेल्वेच्या जागेवरील शाळेला कारवाईची नोटीस; २८ जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याची सूचना

त्यानंतर पोलिसांनी चोरट्याला लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्याची चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने मोबाईल चोरी केल्याची कबूली दिली. त्याच्याकडे प्रवाशाचा चोरीचा मोबाईल आढळून आला. याप्रकरणी प्रवाशाने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण वेलाप्पु हा हैदराबाद येथील रहिवासी असून तो सध्या पनवेल येथील पदपथावर वास्तव्य करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Story img Loader