स्वच्छता अभियानात विघ्न आणणाऱ्यांवर दंड ठोठावण्याचा पालिकेचा इशारा
सार्वजनिक, व्यक्तिगत शौचालयांचा वापर न करता, उघडय़ावर येऊन प्रातर्विधी करणाऱ्या झोपडीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. वारंवार समज देऊनही झोपडीधारक ऐकत नसेल तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा मार्ग पालिकेने मोकळा ठेवला आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक झोपडीधारक जागेचे कारण देऊन पालिकेला व्यक्तिगत शौचालय बांधून देण्यास विरोध करीत आहेत. काही आसपास सार्वजनिक शौचालय असूनही उघडय़ावर प्रातर्विधी करीत आहेत. त्यामुळे पालिकेने हा कठोर निर्णय घेतला आहे.
गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता ठाणे’ ने झोपडीधारकांकडून शौचालये बांधण्यास होत असलेला विरोध, तसेच २७ गाव परिसरातील झोपडीधारक उघडय़ावर प्रातर्विधी करीत असल्याने सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याचे वृत्त दिले होते. त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन संबंधित भागात पाहणी पथके तैनात केली आहेत. केंद्र, राज्य शासनाच्या स्वच्छता भारत अभियानातून पालिका हद्दीत सार्वजनिक स्वच्छतेचे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमामध्ये झोपडीधारकांना व्यक्तिगत शौचालये बांधून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हे शौचालय बांधणीसाठी झोपडीधारकाला पालिकेकडून २८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. झोपडीधारकाने स्वत:ची जागा शौचालय बांधणीसाठी उपलब्ध करून द्यायची आहे. पालिका हद्दीतील झोपडपट्टी भागात अशा प्रकारची १८३९ शौचालये बांधण्यात येणार आहेत. शासनाने पालिकेचा स्वच्छता अभियानाचा सुमारे शंभर कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. या निधीतील ३५ टक्के रक्कम देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. अभियानातील सुमारे ३५ कोटींचा निधी पालिकेला उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे अभियानाच्या मंत्रालयातील सूत्राने सांगितले.
झोपडपट्टीधारकांचाआडमुठेपणा.
स्वच्छता अभियानासाठी आलेला निधी, बांधलेल्या शौचालयांचा अहवाल शासनाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने शौचालये बांधणीचा कार्यक्रम अग्रक्रमाने हाती घेतला आहे. अनेक झोपडीधारक आमच्याकडे पाणी, जागा नाही. कशाला पाहिजेत शौचालये असे सांगून पालिकेची व्यक्तिगत शौचालये बांधून घेण्यास नकार देत आहेत. नेतिवली टेकडी, जेतवननगर, टिटवाळा परिसरातील अनेक झोपडीधारकांनी पहिले पाणी द्या. मगच शौचालये बांधू अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्वच्छतागृह उभारणीत अडथळे येत आहेत. या योजनेतील ४२४ शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. ३२४ शौचालयांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. अशा परिस्थितीत खंबाळपाडा, जेतवननगर, टाटा पॉवर, नेतिवली टेकडी, टिटवाळा येथील इंदिरानगर, तिपन्ना नगर, लहुजी नगर, वालधुनी रेल्वे लाइन भागातील अनेक झोपडीधारक उघडय़ावर प्रातर्विधीसाठी बसत आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. व्यक्तिगत शौचालय बांधून घेण्यास विरोध करणे आणि सार्वजनिक स्वच्छतेत अडथळा आणणे या कलमाखाली उघडय़ावर प्रातर्विधीस बसणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारवाईची वेळ व ठिकाण
खंबाळपाडा, जेतवननगर, टाटा पॉवर, नेतिवली टेकडी, टिटवाळातील इंदिरानगर, तिपन्ना नगर, लहुजी नगर, वालधुनी रेल्वे लाइन झोपडपट्टी परिसरात पहाटे ५ ते ८ वेळेत उघडय़ावर प्रातर्विधीस बसणाऱ्यांवर दंडात्मक व पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.