ठाणे : Navratri 2023 Marathi News ठाणे जिल्ह्यात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सावाच्या कालावधीत रास-गरब्यादरम्यान अनेकदा महिलांची छेडछाड तसेच चोऱ्यांचे प्रकार वाढत असतात. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी सुमारे चार हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. वर्दीसह साध्या वेषातील पोलीस कर्मचारी गरब्याच्या ठिकाणी नजर ठेवत आहेत. शिवाय, राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि दंगल नियंत्रण पथके रात्री तैनात केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. आयुक्तालय क्षेत्रात यंदा ५९५ सार्वजनिक देवी मुर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाकडून रात्रीच्या वेळेत गरब्याचे आयोजन करण्यात येते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर भागात मोठ्याप्रमाणात दांडिया आणि गरब्याचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी विविध भागातून नागरिक दांडिया, गरबा खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी येत असतात. या कालावधीत महिलांसोबत छेडछाडीचे प्रकार किंवा गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरीचे प्रकार घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. गरब्याच्या ठिकाणी साध्या वेषातील महिला आणि पुरूष कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> “देवी महाराष्ट्रातील महिषासुरांचे मर्दन केल्याशिवाय राहणार नाही”; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

वर्दीतील पोलीस देखील मंडपाचा प्रवेशद्वार, रस्त्यावर ठिकठिकाणी तैनात असतील. हुल्लडबाज, छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. रात्रीच्या वेळेत गरबा, दांडिया संपल्यावर महिला घरी जात असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी देखील पोलीस, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्यांतील कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी तैनात राहतील. चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी मोठ्या आयोजकांची बैठक घेतली होती. शक्य असल्यास आयोजकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच मोबाईल चोरांपासून सावध रहाण्याचे आवाहन पोलिसांनी दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्यांना केले आहे.

हेही वाचा >>> ठाणे जिल्हा रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढला; शंभर अतिरिक्त खाटा वाढविण्याचा निर्णय

असा आहे बंदोबस्त

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात चार अपर पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त, १६ साहाय्यक पोलीस आयुक्त, ११५ पोलीस निरीक्षक, ३०६ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, दोन हजार ६२४ कर्मचारी, ६५८ महिला कर्मचारी, ५०० पुरूष आणि २०० महिला गृहरक्षक, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, दंगल नियंत्रण पथके असा बंदोबस्त असेल.

सार्वजनिक देवी मुर्तींची प्रतिष्ठापना

शहर – देवींची प्रतिष्ठापना

ठाणे – २५५

डोंबिवली, कल्याण- १३३

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर- १२०

भिवंडी- ८७

एकूण – ५९५