लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : भिवंडी येथील निजामपूरा पोलीस ठाण्यातील लाचखोर कर्मचाऱ्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हातावर तुरी देऊन लाचखोर कर्मचारी लाचेची रक्कम घेऊन पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

निळकंठ खडके असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो निजामपूरा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. त्याने तक्रारदार यांच्याकडून गुन्ह्यामध्ये अटकेपासून संरक्षण करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांचे भिवंडी आग्रारोड परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद झाले होते. तक्रारदारविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार यांना अटकेपासून संरक्षण देण्यासाठी निळकंठ खडके याने त्यांच्याकडून ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २९ हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

आणखी वाचा-शहापूर : तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून पित्याकडून मुलाची हत्या

सोमवारी पथकाने पडताळणी केली असता खडके याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी पथकाने सापळा रचला. खडके याने शासकीय दुचाकीने तक्रारदार यांना एका ठिकाणी नेले. तिथे त्याने २९ हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेतली. त्यानंतर खडके हा निजामपूरा पोलीस ठाण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात पाहताच, त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस उपअधिक्षक विशाल जाधव यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने जाधव यांना धक्का दिला. तसेच तेथून पळून गेला. याप्रकरणी त्याच्याविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policeman escapes with bribe money in bhiwandi mrj