जिल्ह्यात व्यापक स्तरावर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १९ जून रोजी राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा घेण्यात आली. यावेळी ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये अशाच पद्धतीने पाच वेळेस पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली आहे. या सर्व मोहिमांमध्ये जिल्ह्याची कामगिरी ही १०० टक्क्यांहून अधिक झाली असल्याची माहिती डॉ. दांगडे यांनी दिली. जिल्ह्यात १९ जून रोजी राबविण्यात येणारी मोहीम ग्रामीण भागातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड या तालुका क्षेत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे एकूण १ लाख ७४ हजार ५०२ बालकांना पोलिओ मात्रा देण्यात येणार आहे.
त्यासाठी १ हजार ३७३ बुथ लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याकरिता १ हजार २७६ गटकरण्यात आले आहेत. जिल्ह्यात १९ जून रोजी राबविण्यात येणारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी पणे राबविण्याच्या सूचना डॉ. दांगडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.