डोंबिवली – डोंंबिवली पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस रस्त्यावर पंजाब नॅशनल बँकेशेजारी असलेल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नावाची नामपट्टी झाकून काही राजकीय मंडळींनी बॅनरबाजी केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून रस्त्याची दिशा दाखवणारा महर्षी कर्वे यांच्या नावाची पट्टी झाकली गेला असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

वीस दिवसापूर्वी कोकणातील भराडी आई देवी जत्रोत्सवाच्या निमित्ताने, शिवजयंतीच्या निमित्ताने महर्षी कर्वे यांच्या नावाची नामपट्टी झाकून राजकीय मंडळी फलकबाजी केली आहे. विशेष म्हणजे या फलकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिमा छापण्यात आल्या आहेत. अनेक प्रवासी रस्त्याच्या नावाचा नामफलक पाहून आपला प्रवास करतात. वाहन चालकांना हा दिशादर्शक मार्गदर्शक ठरतो.

भागशाळा मैदानात दररोज सकाळ, संध्याकाळ शहराच्या विविध भागातील नागरिक फिरण्यासाठी येतात. अनेक नागरिकांना महर्षी कर्वे यांच्या नावाचा फलक इच्छित स्थळी नेण्यास मार्गदर्शक ठरतो. एका राष्ट्रपुरुषाच्या नावाची पाटी झाकून आपण बॅनरबाजी करत आहोत, याचे थोडेही भान स्थानिक राजकीय मंडळींना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रपुरुषाच्या नावाची पाटी झाकून त्यावर फलक लावणाऱ्यांवर कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जाणकार नागरिकांकडून केली जात आहे.

पालिकेचे फेरीवाला हटाव, अतिक्रमण नियंत्रण पथक डोंबिवली ह प्रभाग हद्दीत फिरते. त्यांना शहराचे विद्रुपीकरण केलेले फलक दिसत नाहीत का, असे प्रश्न नागरिक करत आहेत. याप्रकरणी एका जागरूक नागरिकाने या फलकांविषयी न्यायालय, पोलीस, पालिकेच्या वरिष्ठांना कळविले आहे. आता प्रशासन महर्षी कर्वे यांच्या नावाची पाटी झाकून बॅनरबाजी करणाऱ्यांवर काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(डोंबिवलीत सुभाष रस्त्यावर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नावाची पाटी झाकून लावण्यात आलेले फलक.)