निवडणुकांचा काळ जवळ आला की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आयाराम गयारामांची ये-जा चालू असते. परंतु यंदा शिवसेना व भाजपमध्ये सुरू झालेले पक्षप्रवेश कार्यक्रमांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून याचा फटका राष्ट्रवादी – काँग्रेस आणि इतर पक्षांना बसत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये निर्माण झालेली मोदी लाट विधानसभा निवडणुकांना कवेत घेऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दाराशी येऊन उभी राहिली आहे. यांमुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बदलापूर, अंबरनाथ नगरपरिषद आणि जिल्हा परषिद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे अनेकांनी भाजप व शिवसेना या पक्षांमध्ये उडय़ा घेतल्या आहेत.
राज्याच्या विधानसभा निवडणुकांवेळी तत्कालिन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आणि मोठय़ा मताधिक्याने ते निवडून आले. त्यांच्यासोबत त्यावेळी बदलापूरमधील नरहरी पाटील, विवेक मोरे, मिथुन कोशिंबे, रमेश सोळसे, शरद तेली या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीमध्ये पाच जणांचा एक गट आपले अस्तित्व टिकवून होता, परंतु विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर व नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच या गटाने शिवसेनेत प्रवेश करत सर्वानाच धक्का दिला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्रीधर पाटील, स्वीकृत नगरसेवक मसुद कोहारी, संजय गायकवाड, राजेंद्र चव्हाण, रतिका सोनावणे यांनी शिवसेना शहर प्रमुख यांच्या साथीने मातोश्रीवर उद्वव ठाकरे व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने बदलापूर राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. त्यामुळे बदलापूर आता राष्ट्रवादीमुक्त झाले आहे. तसेच मनसेच्या तीन नगरसेवकांपैकी एकाने शिवसेनेची तर दुसऱ्याने भाजपची वाट चोखाळल्याने एकच नगरसेवक मनसेत उरला आहे. यांमुळे येथील राजकीय समीकरणे बदलली असून कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात आल्याने नगरपरिषद निवडणुकीत खरी लढाई ही सेना – भाजपमध्येच होणार आहे. अशीच काहीशी परिस्थिती अंबरनाथ शहर व तालुक्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी ेकाँग्रेसच्या नगरसेविका वंदना पाटील, नगरसेवक अशोक गुंजाळ यांनी त्यांच्या समर्थकांसह खासदार कपिल पाटील व आमदार कथोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत राष्ट्रवादीला धक्का दिला. हिच परिस्थिती अंबरनाथ ग्रामिण भागात निर्माण झाली असून वांगणी येथील कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते नरेंद्र शेलार व गणेश नाईक यांचे खंदे समर्थक प्रभू पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्र्वभूमिवर शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Story img Loader