सागर नरेकर, लोकसत्ता
बदलापूरः गेल्या पावणे तीन वर्षांपासून रखडलेल्या कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा प्रचाराची तयारी सुरू केली असून मकर संक्रांत आणि हळदी कुंकू तसेच महिलांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. बदलापुरात काही इच्छुकांनी महिलांसाठी चक्क स्कुटी, सोन्याची अंगठी आणि गृहोपयोगी वस्तू ठेवल्या आहेत. स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना या वस्तू भेट स्वरूपात दिल्या जात आहेत. त्यामुळे पुन्हा राजकीय प्रचाराला वेग आल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> “पक्षावर दबाव आणण्यासाठी कट…”, नरेश मस्केंचा राजन विचारेंवर गंभीर आरोप
चौथी मुंबई म्हणून ओळख मिळवू पाहणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर या मुंबई महानगर प्रदेशातील नगरपालिका आहेत. जवळपास दहा लाखांच्या जवळपास जाऊ पाहणारी ही शहरे गेल्या ३२ महिन्यांपासून लोकप्रतिनिधींविना आहेत. मे २०२० मध्ये या दोन्ही नगरपालिकांच्या सदस्यांची मुदत संपली. त्यानंतर येथे प्रशासकीय राजवट सुरू झाली. २०२० वर्षात येथे निवडणुका होणे अपेक्षित होते. फेब्रुवारी २०२०पर्यंत तशी तयारी दोन्ही नगरपालिकांतर्फे झाली होती. प्रभाग रचना, प्रभार आरक्षण अशी सर्व प्रक्रिया पार पडली होती. मात्र त्यानंतर करोना प्रादुर्भावामुळे सर्व प्रक्रिया थांबली. त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा प्रभाग रचना झाली. तीही रद्दबातल ठरली.
२०२२ वर्षात पुन्हा नव्याने प्रभाग रचना आणि आरक्षण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षणावरून नगरपालिकांचा विषय न्यायालयात गेल्याने पुन्हा निवडणुका थांबल्या. आता याबाबत निकाल होण्याची शक्यता असल्याने निवडणुकांसाठी पुन्हा इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीकाळात विविध भेटवस्तूंच्या माध्यमातून प्रचार मोहिमांना राजकीय पक्ष आणि इच्छुकांनी सुरूवात केली होती. आता जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने या प्रचार मोहिमांना जोर आला आहे. बदलापूर शहरात शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धांचा आयोजन केले जाते आहे.
हेही वाचा >>> ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “नरेश म्हस्केंचा काँग्रेस पक्ष प्रवेश…”
महिलांसाठी एक स्पर्धा विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या सहकार्याने आयोजित केली जाते. त्यात आकर्षक भेटवस्तू महिलांना दिल्या जातात. या स्पर्धांच्या निमित्ताने इच्छुक उमेदवार आपले शक्तीप्रदर्शन तर करत आहेतच. मात्र सोबत मतदारांना आकर्षीत करण्यासाठी भेटवस्तूंची खैरात करत आहेत. बदलापुरातील विविध प्रभागांमध्ये विविध भेटवस्तू चर्चेचा विषय ठरत आहेत. बदलापुरात नुकतेच एका इच्छुक उमेदवाराने स्कुटर, सोन्याची अंगठी अशी महागड्या भेटवस्तू ठेवल्या. सोबत वॉशिंग मशिन, शीतकपाट, दूरचित्रवाणी संच अशा अनेक गृहोपयोगी वस्तूही स्पर्धेत जिंकणाऱ्या महिलांसाठी ठेवल्या आहेत. पैठणी, साड्या आणि इतर वस्तूही दिल्या जात आहेत. या माध्यमातून महिला वर्गाला आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे.
मनोरंजनाचे कार्यक्रमांची रेलचेल
या कार्यक्रमांच्या निमित्ताने मालिका – चित्रपटांमधील नायिका, अभिनेत्रींना पाचारण केले जात आहे. तसेच विनोदी कार्यक्रमाच्या कलाकारांच्या उपस्थितीने महिलांशिवाय इतर नागरिकही कार्यक्रमाच्या स्थळी येत असल्याने प्रचार सोपा होतो आहे.