वसई : वसईतील मतदान केंद्रातील महिला कर्मचाऱ्याला मतदानासाठी बोटावर लावण्यात आलेल्या शाईमुळे वेदना होऊन ती सुजल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मतदारांच्या बोटाला शाई लावताना त्यांच्या हाताला शाई लागली. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रात गेल्यानंतर मतदारांच्या डाव्या बोटाला काळ्या रंगाची शाई लावण्यात येते. केंद्रातील एका कर्मचाऱ्याची या कामासाठी नियुक्ती करण्यात येते. मात्र या शाईमुळे वसईतील काही कर्मचाऱ्यांना त्रास जाणवू लागला.
वसईच्या नाझरेथ शाळेतील मतदान केंद्रावरील दीपाली बागुल यांच्या बोटाला शाई लागली. काही वेळानंतर त्यांच्या बोटांना वेदना होऊ लागल्या. या प्रकाराकडे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, मात्र नंतर वेदना वाढू लागल्या. त्यात त्यांना मतदान केंद्र सोडता न आल्याने सायंकाळपर्यंत दीपाली यांच्या बोटांना सूज आली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. बोटांना सूज येण्याची घटना ही काळ्या शाईची दुष्परिणामामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. औषधोपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले. बोटांना सूज आल्याची तक्रार घेऊन चार ते पाच रुग्ण आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
शाई ज्या बाटतील होती. ती छोटी आणि निमुळती होती. त्यामुळे त्यातून शाई काढून लावताना हाताला लागत होती. तिथे टीपकागदाची सोय नव्हती, असे दीपाली यांनी सांगितले.