जीआयपी धरणक्षेत्रात रासायनिक सांडपाण्याचा निचरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच एमआयडीसीच्याच शेजारी असलेल्या जीआयपी धरण क्षेत्रात बेकायदा कंपनी सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट धरण क्षेत्रातील जमिनीत रसायन मुरवत असल्याचा ठपका ठेवीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला टाळे ठोकले आहे.

एमआयडीसीला लागून असलेल्या काकोळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोडणाऱ्या ‘काव्या शाइन’ या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली. मंडळाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर या ठिकाणी दोन शोष खड्डय़ात रासायनिक सांडपाणी मुरवले जात असल्याचे आढळून आले. तसेच ही कंपनी एमआयडीसीच्या हद्दीबाहेर असल्याचेही समोर आले. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीवर कारवाई केली.  या कंपनीचे वीज आणि पाणी तोडण्याचेही आदेश या वेळी देण्यात आले आहेत. तसेच इतर आणखी अशा कोणत्या कंपन्या सुरू आहेत, याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले आहे.

‘कंपन्यांना आवरा’

अंबरनाथ एमआयडीसीच्या दोन्ही बाजूंना पाण्याचे मोठे जलस्रोत आहेत. एकीकडे अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण तर दुसऱ्या बाजूला रेल्वेच्या रेलनीर प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारे जीआयपी धरण आहे. कंपन्या या धरणांच्या पाणलोट क्षेत्रापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे जलस्रोतापासून रसायने तयार करणाऱ्या कंपन्या किती दूर असाव्यात, याचेही नियोजन होणे गरजेचे होते, असे मत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अमर सुपाते यांनी व्यक्त केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution control board lock illegal company in gip dam area
Show comments