ठाणे : शहरात स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या विविध योजना राबवल्या जात असताना, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः बसगाड्यांच्या थांब्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेली आसने, तुटलेले लोखंडी पत्रे आणि अस्वच्छ परिसर यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठाणे शहरातील अनेक नागरिकांना रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. यामुळे ते नागरिक बसगाड्यांनी प्रवास करण्यास पसंती देतात. यासाठी शहरातील विविध मार्गांवर एकुण ४७० थांबे उभारण्यात आले आहेत. बसगाडी येईपर्यंत या थांब्यांवरील आसनांवर प्रवासी बसत असतात. परंतु काही ठिकाणी असलेल्या थांब्यांची बिकट अवस्था झाल्याचे दिसत आहे. या थांब्यांवर उभे राहण्यास देखील येत नसल्याने प्रवाश्यांना थेट मुख्य रस्त्यावरच बसगाड्यांची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. बस थांब्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची अवस्था आणखीनच बिकट होऊ लागली आहे.

बस थांब्यावरील तुटलेले पत्रे, तुटलेले आसन, त्याचबरोबर आजूबाजूचा कचरा हे पाहून बस थांबे अत्यंत बिकट अवस्थेत दिसत आहेत. शहरातील रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता हरीनिवास सर्कल याठिकाणी असलेला बस थांबा खूप दिवसांपासून दूरावस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याचबरोबर गोकुळ नगर या बस थांब्याची देखील दूरवस्था झाल्याचे दिसत आहे. या ठिकाणच्या थांब्यावर गर्दुल्यांचा वावर असतो. तसेच त्यांची कपडे, चादरी ठेवलेल्या असतात त्यामुळे प्रवासी थांब्यावर थांबण्याऐवजी मुख्य रस्त्यावर थांबत असतात.

ठाणे जिल्हा रुग्णालय थांबा त्याचप्रमाणे बाळकुम, कळवा, माजिवडा, कॅसल मिल नाका, कोर्ट नाका, ठाणे स्थानकाजवळ असलेल्या झुडिओ बाहेरील थांबा अशा विविध भागांतील थांब्यांची दुरवस्था आहे. त्याचप्रमाणे बस थांब्यांवर रात्रीच्या वेळी भिकारी तसेच गर्दुल्यांचा वावर असतो. थांब्यांचा वापर अडगळीचे सामान ठेवण्याकरिता तसेच कपडे सुकवण्याकरिता करतात. रात्रीच्या वेळेस महिला प्रवाशांना बस थांब्यांवर थांबणे असुरक्षिततेचे वाटते. तर काही बस थांबे पदपथावर असल्याने पायी प्रवास करणाऱ्यांनाही त्रासदायक होतो. शहरातील अनेक असे बस थांबे आहेत. या बस थांब्यांची अवस्था पावसाळ्यात अधिकच दयनीय होते.

२०१३ मध्ये ४७० बस थांबे उभारून त्यावर जाहिरातींसाठी परवानगी देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, या कराराची मुदत ऑगस्ट २०२४ मध्ये संपली आहे. या प्रकरणासाठी लवादाची नेमणूक करण्यात आली असून आर.एम. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु रस्ते रुंदीकरण आणि इतर नागरी विकास प्रकल्पांमुळे १६० थांबे काढावे लागले, ज्यामुळे नुकसान झाल्याने मुदत वाढीची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. -भालचंद्र बेहेरे, परिवहन व्यवस्थापक

Story img Loader