खरे तर या संगीत मैफलीचे राज कपूर ते अमिताभ बच्चन हे शीर्षक वाचून या दोन नायकांवर चित्रित झालेली लोकप्रिय गाणी ऐकायला मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र ही नेहमीच्या पठडीतील गाजलेल्या हिंदी-मराठी गाण्यांची भेळ होती.
विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ‘गोल्डन एरा’ हा कार्यक्रम ब्राह्मण सोसायटी येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात ‘मागे उभा मंगेश’ या गाण्याने झाली. त्यानंतर ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ सादर झाले. त्यानंतर एकापेक्षा एक सरस गाण्यांनी मैफलीत रंग भरायला सुरुवात झाली. ‘मेरा साया’ सिनेमातील ‘झुमका गिरा रे बरेली के बाझार मे’ या गाण्याचे सादरीकरण होत असताना रसिकांनी टाळ्यांचा ताल धरला. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात ‘खेळ मांडला’, ‘गोमु संगतीने’, ‘मल्हार वारी’ ही मराठी गाणीही सादर झाली. ठाणेकर रसिकांनी माधुरी करमरकर, मधुरा देशपांडे यांच्या आवाजाला दिली. ‘होठो पे ऐसी बात’ या गाण्यावर तर रसिकांना हात हलवून नाचण्याचा मोह आवरता आला नाही. चित्रपट संगीत म्हणजे त्या त्या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी गाजलेली गीते; परंतु हीच गीते रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवू लागतात. त्यातील काही गाणी सहज विसरली जातात, तर काही गाणी कितीही जुनी झाली तरी नवीन पिढीच्याही ओठावर असतात. अशी अनेक सदाबहार गाणी या मैफलीत ऐकायला मिळाली. ‘छोड दो आँचल, जमाना क्या कहेगा’ हे लडिवाळ आणि नटखट गाणे अगदी छान पद्धतीने सादर झाले. रसिकांनी त्या गाण्याला मनमुराद दाद दिली. महाराष्ट्र म्हटले की लावणीचा ठसका आलाच. या मैफलीतही ‘ऐन दुपारी यमुना तीरी खोडी कोणी काढली’ या लावणीने ढोलकीचा कडकडाट सुरू झाला. अशाच काही गाजलेल्या लावण्यांचे मुखडे घेऊन या सत्राची अखेर ‘वाजले की बारा’ने झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या गाण्याने मैफलीची भैरवी झाली. मंगला खाडिलकर यांच्या सुरेख आणि खुमासदार शैलीतील निवेदनाने मैफलीची रंगत वाढली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

– भाग्यश्री प्रधान

 

– भाग्यश्री प्रधान