डोंबिवली – डोंबिवलीतील मोठागाव येथील उल्हास खाडीवरील माणकोली उड्डाण पुलाच्या पोहच रस्त्याचा काही भाग दोन दिवसापूर्वी खचला होता. या पोहच रस्त्याच्या आजुबाजुला तडे गेले होते. खचलेला भाग पुन्हा सुस्थितीत करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठेकेदाराने सुरू केले आहे. माणकोली पुलाच्या डोंबिवली बाजुकडील दिशेला भराव देऊन पोहच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पोहच रस्त्यासाठी मातीचा भराव आणि आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करून भराव आणि त्यावरील सीमेंट काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदाराने पूर्ण केले आहे. या पुलावरून अवजड, जड वाहने सोडून हलकी सर्व प्रकारची वाहने धावतात. जड वाहनांनी या रस्त्यावरून धाऊ नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजुला रस्त्यापासून १५ फूट उंचीवर लोखंडी रस्ता रोधक लावण्यात आले आहेत.

या पुलावरून अवजड वाहने धावत नसताना दोन दिवसापूर्वी या पुलाच्या पोहच रस्त्याचा काही भागाला खचला आणि बाजुच्या भागाला तडे गेले. काही चाणाक्ष वाहन चालकांच्या ही बाब निदर्शनास आली. ही माहिती तात्काळ एमएमआरडीएच्या अधिकारी आणि ठेकेदारांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी या पोहच रस्त्याची पाहणी करून आवश्यक त्या सूचना ठेकेदाराला केल्या. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

खचलेला भाग खोदून बाहेर काढून त्या भागात घडीव दगडी आता टाकण्यात आल्या आहेत. या रस्त्यावर दिवसा वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेत ही कामे पूर्ण केली जात आहेत. खचलेल्या भागाच्या दोन्ही बाजुला रस्ता रोधक लावून रस्त्याची एक मार्गिका बंद करण्यात आली आहे.लपुलाचे काम पूर्ण होऊन आता दीड वर्ष झाले. काही कामे अद्याप सुरू आहेत. शिवसेना, भाजपमधील सुंदोपसुंदीच्या राजकारणामुळे या पुलाचे उद्घाटन न करताच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच पूल खचल्याने आणि बाजुला तडे गेल्याने या कामाच्या दर्जाविषयी नागरिक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

अधिक माहितीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या पुलाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, माणकोली पुलाच्या पोहच रस्त्याच्या (डेक) काही भाग खराब झाला होता. तो भाग काढून टाकून तातडीने सुस्थितीत करण्याच्या सूचना टेकेदाराला केल्या आहेत.