कल्याण : मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही भागाची भविष्यकालीन पाण्याची गरज भागविणाऱ्या पोशीर धरण प्रकल्प उभारणीचा सहा हजार ३९४ कोटीचा प्रस्ताव ठाणे येथील कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने राज्य तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या अंतीम छाननीनंतर राज्याच्या जलसंपदा विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला आहे.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील शहरे आणि नागरीकरण झालेल्या भागाची भविष्यकालीन पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने १९९८ मध्ये जलतज्ज्ञ डाॅ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक ११ तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने पिंजाळ, शाई-काळू, गारगाई, पोशीर या धरणांच्या उभारणींची सूचना अहवालात केली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील शहरांची सन २०२० मधील पाण्याची गरज भागविण्यासाठी पोशीर धरणाच्या उभारणीचे काम आवश्यक मंजुऱ्या मिळवून २०१६ नंतर तात्काळ हे काम सुरू करण्याची सूचना डाॅ. माधवराव चितळे समितीने शासनाला केली होती. सततची बदलणारी सरकारे, शासकीय लालफितशाहीमध्ये हे प्रकल्प कागदोपत्री रखडले. वाढत्या नागरीकरणामुळे वस्त्यांमध्ये पाणी टंचाईचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या रखडलेल्या धरण प्रकल्पातील पोशीर प्रकल्प आता आकाराला आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रशासकीय प्रस्ताव
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण या शासकीय संस्थांच्या समन्वयातून तयार करण्यात आलेला पोशीर धरणाचा प्रस्ताव पुणे येथील राज्य तांत्रिक सल्लागार समितीने अंतीम छाननी करून कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यातील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पोशीर धरण उभारणीस नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा. तशी सहमती त्यांनी जलसंपदा विभागास द्यावी, असे निर्देश दिले आहेत.
जलसंपदा विभागाच्या सन २०२३-२४ च्या प्रचलित दरसूचीनुसार नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना यांच्या संकल्पनानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एकूण सहा हजार ३९४ कोटी १३ लाख ५० हजार एवढा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांमध्ये मान्यतेसाठी पाठविला आहे.
धरण माहिती
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुरुंग गाव हद्दीतील पोशीर नदीवर हे धरण होईल. दगड, मातीचे हे धरण असेल. धरणात ३४९ दशलक्ष घनमीटर पाणी साठा व ८३२ दशलक्ष लीटर पाणी वापरासाठी उपलब्ध असेल. २६७५ मीटर धरणाची लांबी आहे. उंची ६९ मीटर आहे. या धरणासाठी २३०९ हेक्टर जमीन आवश्यक आहे. यात ९७१ हेक्टर जमीन वन विभाग, १३३८ हेक्टर जमीन खासगी आहे. उल्हास खोऱ्यात हे धरण असेल. धरणाला वक्राकार सात दरवाजे असतील. १०२ मीटर लांबीचा सांडवा प्रस्तावित आहे.
राज्य तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या अंतीम छाननीनंतर पोशीर धरणाचा प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाच्या जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या मान्यतेनंतर आवश्यक त्या पुढील प्रक्रिया केल्या जातील. विनोद मुंजाप्पा कार्यकारी अभियंता,
कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे.
मुंबई, ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची भविष्यकालीन पाण्याची गरज भागविण्यासाठी उल्हास खोऱ्यातील पोशीर धरण प्रकल्प मार्गी लागावा म्हणून अनेक वर्ष आपण पाठपुरावा करत आहोत. या प्रयत्नांना आता यश येत आहे. राम पातकर माजी नगराध्यक्ष, बदलापूर नगरपालिका.