ठाणे : अपेक्षित पाऊस झालेला नसल्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईसह ठाणे आणि भिवंडी शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात होणार आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात मुंबईकरांबरोबरच ठाणेकर आणि भिवंडीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका संपुर्ण शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करते. त्यापैकी मुंबई महापालिकेकडून ६५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदा धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिकेने १० दशलक्षलीटर इतका वाढीव पाणी पुरवठा मंजुर केला होता. त्याचे वागळे इस्टेट परिसरात नियोजन करण्यात येणार आहे. परंतु, कपातीच्या निर्णयामुळे हा वाढीव पाणी पुरवठाही शहराला मिळणार नसल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचे ठाणे शहरातील कोपरी, गावदेवी, हाजुरी, लुईसवाडी, अंबिकानगर, बाळकुम, किसननगर, पाचपखाडी आणि टेकडी बंगला भागात नियोजन करण्यात येते. त्यामुळे या भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. भिवंडी महापालिका संपुर्ण शहरात विविध स्त्रोतांमार्फत एकूण ११५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी मुंबई महापालिकेकडून ४० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात दहा टक्के कपात मुंबई महापालिकेने लागू केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेक़डून भिवंडी शहराला ४० ऐवजी ३६ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. या कपातीमुळे जुनी भिवंडी, पद्मानगर, दिवानशहा दर्गा, शांतीनगर या भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.