लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील आणि आंध्रा धरणातील पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागला असून सद्यस्थितीत बारवी धरणात अवघे २७.४३ टक्के तर आंध्रा धरणात २९.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन टक्के हा पाणीसाठा कमी आहे. या दोन्ही धरणातील पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. असे असले तरीही पावसाची अद्याप कुठलीही चिन्ह नसल्याने पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काही अंशी पाणी कपात लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील नागरी वसाहती तसेच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यापैकी बारवी धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ही ३३८.८४ दशलक्ष इतकी आहे. तर आंध्रा धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ३३९.१४ दशलक्ष इतकी आहे. या दोन्ही धरणांच्या पाणी पातळीत सद्यस्थितीत घट होऊ लागली आहे. सद्यस्थितीत बारवी धरणात एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ९२.९५ दशलक्ष म्हजणेच २७.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर आंध्रा धरणात सद्यस्थितीत १०१.५५ दशलक्ष म्हणजेच २९.९४ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

आणखी वाचा-कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना धमकी देणारा अटकेत

मागील वर्षी ७ जून रोजी बारवी धरणात २९.७० टक्के तर आंध्रा धरणात ३२.४७ टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत या दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात सुमारे तीन टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्हा प्रशासन तसेच पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग जिल्ह्यातील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्याचा आढावा घेत असतात. अशाचप्रकारे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मुख्य धरणांतील पाणी साठ्याचा आढावा घेऊन त्यातील पाणी साठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे.

जिल्ह्याला अधिकचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी काळू, शाई, कुशीवली ही धरणे प्रस्तावित असली तरी या धरणांच्या उभारणीबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पाठ पुरावा होताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्रा धरणाची पाणी पातळी कमी झाल्यास संपूर्ण जिल्ह्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असते. जिल्ह्याला सुमारे १५ जुलै पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. असे असले तरीही पावसाची अद्याप कुठलीही चिन्ह नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात काही अंशी पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही.