डोंबिवली- येथील एमआयडीसीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिर परिसरातील टपाल आणि पारपत्र कार्यालय चारही बाजुने पावसाच्या पाण्याने जलमय झाले आहे. ग्राहक, टपाल कर्मचाऱ्यांना अर्धाफूट पाण्यातून वाट काढत कार्यालयात यावे लागले. टपाल कार्यालया मागून गेलेल्या नाल्यात ठेकेदाराकडून मातीचा भराव टाकण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यासाठी रस्ता नसल्याने नाल्यातील पाणी माघारी येऊन ते टपाल कार्यालय परिसरात शिरले.
डोंबिवली एमआयडीसी नाल्यांच्या लगत अनेक कंपन्यांनी बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांच्या माध्यमातून निघणारा राडारोडा ठेकेदार लगतच्या नाल्यामध्ये जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने लोटून देतो. नाल्याचे असे प्रवाह अनेक ठिकाणी बांधकामधारक कंपनीच्या ठेकेदाराने बुजविले आहेत. ड्रीम पॅलेस सभागृहाच्या पाठीमागील नाल्याचा काही भाग मातीच्या भरावाने अशाच पध्दतीने बंद केला आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
नाल्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने एमआयडीसीच्या विविध भागात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका उतार मार्गावर असलेल्या एमआयडीसीतील टपाल आणि पारपत्र कार्यालयाला बसला आहे, असे स्थानिकांनी सांगितले. एमआयडीसी अधिकारी या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. टपाल कार्यालय आवार जलमय झाल्याने कर्मचाऱ्यांनी पहार घेऊन पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळे करण्यासाठी प्रयत्न केले. पाणी ओसरेपर्यंत ग्राहकांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले. किरकोळ पावसात ही परिस्थिती तर मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर टपाल कार्यालयात पाणी घुसण्याची शक्यता परिसरातील नागरिक, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये लालचौकीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानी, प्रवाशांना रिक्षेतून उतरवण्याचे प्रकार
टपाल कार्यालयाच्या मागे एक बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा राडारोडा नाल्यात टाकण्यात आल्याने पावसाचे पाणी या भरावाला अडकले. ते माघारी येऊन परिसरात पसरते. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील नाल्यांची पाहणी करुन नाले बुजवून बांधकाम करणाऱ्या, नाल्यांमध्ये भराव टाकणाऱ्या ठेकेदार, विकासकांवर कारवाई करण्याची मागणी एमआयडीसीतील नागरिकांकडून केली जात आहे.टपाल कार्यालयात येणाऱ्या ग्राहक सेवेपेक्षा एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांना पहिले आवारातील तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले.