ठाणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाणे शहरात पोस्टर लावून ‘पक्ष कुणी चोरला?’ असा सवाल उपस्थित केला असतानाच, त्याला आता शिंदेच्या सेनेने पोस्टरने प्रतिउत्तर दिले आहे. खुर्चीसाठी पक्ष आणि विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्याऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करु नयेत, शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे. तो तुमचा नोकर नाही, असा उल्लेख शिंदेच्या शिवसेनेने पोस्टरवर केला आहे. तर, दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यापुढे उद्धव ठाकरे हे नतमस्तक होत असल्याचे व्यंगचित्राचे पोस्टर अनोळखी व्यक्तींनी लावले असून हे पोस्टर ठाकरे गटाने काढून टाकले आहेत. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात दोन्ही शिवसेनेत पोस्टर वॉर रंगल्याचे चित्र आहे.
ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ठाणे शहरात पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर ‘पक्ष कुणी चोरला?’ दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, ‘काय आहे हिंदुत्व ?’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासह, त्यावर व्हॉटसअप क्रमांक असून नागरिकांना आपली मते त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून एक प्रकारची मोहीम सुरु असून लोकांच्या न्यायालयात न्याय मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. तसेच या पोस्टरच्या माध्यमातून ठाकरे गटाने शिंदेच्या सेनेवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. त्याला आता शिंदेच्या सेनेनेही पोस्टरमधून उत्तर दिले आहे. शिंदेच्या शिवसेनेचे राजेश मोरे यांनीही पोस्टर लावून ठाकरे गटावर टीका केली आहे.
हेही वाचा…अपंगांच्या राखीव लोकल डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांवर डोंबिवली पोलिसांची कारवाई
पक्ष कोणी विकला ..? असा सवाल करत खुर्चीसाठी पक्ष व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्याऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करु नयेत, असे पोस्टरवर म्हटले आहे. तसेच शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे. तो तुमचा नोकर नाही, असे उत्तरही दिले आहे. त्याचबरोबर ठाणे येथील तीन पेट्रोल पंप भागात उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर पोस्टर लावणाऱ्यांचा उल्लेख नव्हता. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राद्वारे टीका करण्यात आली होती. या पोस्टरवर दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यापुढे उद्धव ठाकरे हे नतमस्तक होत असल्याचे व्यंगचित्र होते आणि घालीन लोटांगण वंदिन चरण… असा उल्लेख करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी त्याठिकाणी कार्यकर्त्यांसह जाऊन ते पोस्टर उतरविले. या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात दोन्ही शिवसेनेत पोस्टर वॉर रंगल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…घोडबंदर भागातील खड्डे, कोंडीविरोधात नागरिक एकवटले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा जपत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात भगवा सप्ताहाचे आयोजन केले असून या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते घरोघरी पोहचत आहेत. त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आमचा पक्ष चांगल्या पद्धतीने वाढत आहे. यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे हा केवीलवाणा प्रकार स्वत:चे नाव आणि छायाचित्र न देता असे पोस्टर लावून चर्चेत यायचे. असे पोस्टर लावणाऱ्यांची मला किव येते. – केदार दिघे,ठाणे जिल्हा प्रमुख, उबाठा
© The Indian Express (P) Ltd