पावसाळ्यात संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडी पूलावरील रस्त्याच्या नुतनीकरणास सुरूवात झाली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दररोज मध्यरात्री याठिकाणी डांबरीकरण केले जात असून आठवड्याभरात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची खड्ड्यांमुळे होणाऱ्या प्रवासातून तसेच वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जात आहे.
हेही वाचा >>>जळगाव, पालघर, ठाणे शहरांमध्ये वाहने चोरणारा सराईत चोरटा अटक
मुंबई- नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडी पूल हा वाहतूकीच्या दृष्टिने महत्त्वाचा मानला जातो. या पुलावरून दररोज हजारो हलकी वाहने मुंबई, ठाणे, घोडबंदर किंवा नाशिक, कल्याण-डोंबिवली, भिवंडीच्या दिशेने वाहतूक करतात. उरण येथील जेएनपीटी बंदरातून सुटणारी अवजड वाहने याच पूलावरून भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करतात. या खाडी पूलावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. मागील दोन वर्षांपासून खड्ड्यांचे प्रमाण हे अधिक होते. खड्ड्यांमुळे या मार्गांवर वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे मुंबई-ठाणे येथून नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर आणि भिवंडीहून ठाणे-मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर पावसाळ्यात पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागत होत्या. त्याचा परिणाम ठाणे, भिंवडी आणि मुंब्रा शहरातील अंतर्गत मार्गांही बसत होता. अवघ्या १५ ते २० मिनीटांच्या अंतरासाठी प्रवासी आणि वाहन चालक दीड ते दोन तास अडकून पडत होते. यासंदर्भात वाहन चालकांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून टिकेची झोड उठू लागल्यानंतर प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरुपात त्याठिकाणी दुरुस्ती करून खड्डे बुजविले जात होते.
हेही वाचा >>>ठाणे: जखमी श्वानावर उपचार सुरू असतानाच तिच्या पिलाचा अपघाती मृत्यू; ठाण्यातील पाचपाखाडी येथील घटना
पाऊस सुरू होताच पुन्हा त्याठिकाणी खड्डे पडत होते. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. आता पावसाळा संपताच या पूलावरील रस्त्याचे डांबराच्या साहाय्याने नुतनीकरण करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून दररोज मध्यरात्री या मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. येत्या आठवड्याभरात या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे. डांबरीकरण पूर्ण झाल्यास या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या खड्डे कोंडीमुळे ठाणेकरांना मोठा दिसाला मिळण्याची शक्यता आहे.