डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेत सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा फुले रस्त्यावर माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांच्या घराच्या बाहेर ठेकेदाराने गेल्या सहा दिवसांपासून जलवाहिनीच्या कामासाठी खड्डा खोदला आहे. या खड्ड्यांमुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. पादचारी, शालेय विद्यार्थी, पालक येथून येजा करतात. याची जाणीव असुनही ठेकेदार खोदलेल्या खड्ड्यातील काम पूर्ण करीत नसल्याने रिक्षा चालक नाराजी व्यक्त करत आहेत.

महात्मा फुले रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. या कामाचा टप्पा दोन पाण्याच्या टाकी जवळील माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांच्या घरा जवळ येऊन थांबविण्यात आला आहे. या रस्ते कामाच्या एका बाजुला ठेकेदाराने गेल्या सहा दिवसापूर्वी जलवाहिन्यांच्या कामासाठी खड्डा खोदून ठेवला आहे. खड्डा खोदल्यानंतर तातडीने ते काम पूर्ण न करता खड्डा आजुबाजुला दोऱ्या बांधून आहे त्या स्थितीत ठेवला आहे. चार ते पाच फूट खोल खड्ड्यात पाणी साचले आहे. नकळत लहान मुलगा, पादचारी या खड्ड्या जवळून गेला तर तो खड्डयात पडण्याची भीती या भागातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

खड्डा खोदण्यापूर्वी शहर अभियंता विभाग, वाहतूक विभाग, प्रभाग साहाय्यक आयुक्त, स्थानिक अभियंते यांची परवानगी ठेकेदाराला घ्यावी लागते. परंतु, अशी कोणतीही परवानगी न घेता ठेकेदाराने अधिकाऱ्यांना न जुमानता खड्डा खोदल्याने अधिकारी चक्रावून गेले आहेत. शहर अभियंता विभागाचे ठेकेदारांवर नियंत्रण राहिले नसल्याने ठेकेदार मनमानी करत असल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसत आहे. शनिवार, रविवारी डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात भूमाफिया रस्ता खोदून चोरून जलवाहिन्या घेत आहेत. त्यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

लोकप्रतिनिधीचा धाक

फुले रस्त्यावर खड्डा खोदून ठेवलेल्या ठेकेदाराला पालिका अधिकाऱ्यांनी खड्डयाशी संबंधित काम तातडीने करून घ्या. प्रवाशांना त्रास होत आहे असे सांगितले तर हा अधिकारी उलट अधिकाऱ्यांची तक्रार ठाण्यातील एका लोकप्रतिनिधीला करून अधिकाऱ्यांना धाक दाखवत आहे. संबंधित लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना दरडावत असल्याने या ठेकेदाराला कोणीही बोलण्यास पुढे येत नसल्याचे कळते. शहर अभियंता विभागाच्या ढेपाळलेल्या कारभाराचे चटके प्रवाशांना बसत असल्याची टीका रिक्षा चालकांकडून केली जात आहे. खड्डे खोदलेल्या ठिकाणी सकाळ, संध्याकाळ रिक्षा, शाळेच्या बस एकत्र येत असल्याने वाहूतक कोंडी होत आहे.

जलवाहिनीच्या कामासाठी खड्डा खोदला आहे. ते काम लवकरच पूर्ण केले जाईल.

-किरण वाघमारे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग

Story img Loader