लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अवजड तसेच इतर वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या महामार्गांसह प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे काही दिवसांपुर्वी करण्यात आली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुजविलेले खड्डे उखडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे मोठी डबकी तयार झाल्याने अपघातांची भिती व्यक्त होत आहे. या खड्ड्यांमुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यामुळे खड्डे आणि कोंडीच्या जाचातून केव्हा सुटका होईल असा प्रश्न वाहन चालकांकडून उपस्थित होत आहे.
ठाणे जिल्ह्यातून मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि शिळफाटा मार्ग जातो. या मार्गांवरून जड-अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक सुरु असते. या वाहनांची संख्याही मोठी आहे. हे रस्ते सर्वाधिक वर्दळीचे आहेत. या रस्त्यांना शहरातील अंतर्गत रस्ते जोडण्यात आलेले आहेत. घोडबंदर आणि मुंबई नाशिक महामार्गावरील तीन हात नाका ते घोडबंदर मार्गावरील कासारवडवली, गायमुख भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते आक्रसले आहेत. त्यातच यंदा पावसाळ्यात महामार्ग, मुख्य मार्गांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले होते. वाहन चालकांना अवघ्या अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरासाठी सुमारे दोन तास लागत होते. यावरून संबंधित यंत्रणावर टिका होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याची पाहणी करून सर्वच यंत्रणांना खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीला वेग आला होता. मास्टीक, राडारोडा टाकून हे खड्डे बुजविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे या मार्गावरील बुजविलेले खड्डे उखडल्याचे चित्र आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका परिसर, साकेत पूल, आर.सी. पाटील चौक, दिवे-अंजुर, आसनगाव, वाशिंद, कसारा या भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. काही ठिकाणी बुजविलेला रस्त्यांवर उंचवटे झाले आहेत. त्याचा परिणाम वाहतूकीवर होत आहे. त्यामुळे अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. घोडबंदर मार्गाची अवस्था देखील वाईट आहे. या मार्गावर मानपाडा, कापूरबावडी, आर. मॉल परिसर, कासारवडवली तसेच उड्डाणपूलांवर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच सेवा रस्ते खड्ड्यात गेले आहेत. तर, ब्रम्हांड-हिरानंदानी इस्टेट मार्ग, पातलीपाडा भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडेल आहेत. कल्याण येथील दुर्गाडी किल्ला मार्ग, कोळसेवाडी, काटेमानिवली, चिंचपाडा, मलंगगड, डोंबिवलीतील ठाकुर्ली, चोळेगाव रस्ता, व्ही.पी. रोड, मानपाडा रोड, एमआयडीसी रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुपारी आणि रात्री वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचा दावा करण्यात आला असला तरी खड्डे कायम आहेत. -रुचित तिवारी, वाहन चालक.
आणखी वाचा-सेंच्युरी रेयॉन कंपनीतील टँकर स्फोटाप्रकरण : कंपनी प्रशासनासह टँकरमालकावर गुन्हा
मुंबई-नाशिक महामार्ग पूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित होता. महामार्गाचे दर तीन वर्षांनी मजबूतीकरण करणे आवश्यक असते. २०१६ नंतर संबंधित प्राधिकरणाने रस्त्याचे मजबूतीकरण केले नाही. २०२१ मध्ये हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला. मजबूतीकरण झाले नसल्याने खड्डे पडत आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू असते, अशी प्रतिक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका अभियंत्याने दिली.