डोंबिवली- डोंबिवली शहराच्या विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांनी नागरिक, प्रवासी हैराण आहेत. रस्त्यावरील धुळीच्या उधळ्याने अनेक व्याधी नागरिकांना होत आहेत. अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने समाज माध्यमी नागरिकांनी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाचे या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी जनआंदोलनाची हाक दिली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जनआंदोलनाचा लघुसंदेश विविध प्रकारच्या समाज माध्यमांमधून फिरत आहे. या जनआंदोलनासाठी नागरिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन या लघुसंदेशात करण्यात आले आहे. नागरिकांनी नागरिकांच्या सोयीसाठी केलेले हे जनआंदोलन म्हणून कोणाही राजकीय पुढारी, नेत्याला या जनआंदोलनात नेतृत्व करण्यासाठी पुढे येऊ न देण्याचा निर्धार या समाज माध्यमींनी केला आहे. गुरुवार, २० ऑक्टोबर रोजी डोंबिवलीतील सर्व नागरिकांनी रात्री आठ ते आठ वाजून पाच मिनिटापर्यंत आपल्या घरातील दिवे बंद करावेत. किंवा शंखनाद, घंटानाद, थाळीनाद करुन परिसर दणाणून सोडावा. शक्य झाल्यास काहींनी आपल्या परिसरात जमावे आणि शहरातील नागरी समस्यांच्याच्या विषयावरुन निषेध करावा, असे आवाहन समाज माध्यमातून करण्यात आले आहे.

हे जनआंदोलन यशस्वी झाले तर कल्याण डोंबिवली पालिकेवर अशाच प्रकारचा दबाव आणून यापुढे नागरी समस्या, विकास कामे मार्गी लावण्यासाठी भाग पाडता येईल, असे समाज माध्यमींनी म्हटले आहे. अतिशय सनदशीर मार्गाने हे जनआंदोलन करावे. नागरिकांची ताकद काय आहे हे प्रशासनाला दाखवून द्यावे. हा या जनआंदोलनाचा मुख्य उद्देश आहे, असे समाज माध्यमींनी समाज माध्यमावर म्हटले आहे. दहा वर्षापूर्वी डोंबिवलीत बेकायदा बांधकामांच्या विरुध्द एक नागरी विकास मंच स्थापन झाला होता. या मंचाच्या माध्यमातून प्रशासनावर यापूर्वी दबाव आणून विविध कामे मार्गी लावण्यात आली होती. कल्याण ड़ोंबिवली शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक विकास कामे रखडली आहेत. बेकायदा बांधकामांनी धुमाकूळ घातला आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.