ठाणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दुरवस्था; पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप
दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीस उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले असून गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेऊनही हे खड्डे बुजविण्याचे काम संथगतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ऊन आणि पावसापासून प्रवाशांचे संरक्षण व्हावे यासाठी सॅटीस पुलावर काही महिन्यांपूर्वीच आच्छादन तयार करण्यात आले होते. या आच्छादनामुळे या दोन्ही समस्येपासून प्रवाशांनी सुटका मिळवली असली तरीदेखील सॅटीसवरील खड्डय़ांनी मात्र अद्याप त्यांची पाठ सोडलेली नाही.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला सॅटीस या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलावर बसथांबे असल्याने अनेक प्रवशांना ऊन-पावसाचा मारा सहन करावा लागत होता. यासाठी उपाय म्हणून काही दिवसांपूर्वीच ठाणे महानगर पालिकेने येथे अच्छादन टाकण्याचे काम पूर्ण केले. स्थानिक खासदार, आमदार यांनी त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी महापालिकेस उपलब्ध करून दिला. या आच्छादनामुळे प्रवाशांना दिलासा मिळत असला तरी पुलावर जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे मात्र प्रवासी हैराण झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून सॅटीसवरील नितीन कंपनी आणि येऊर बस थांब्याच्या समोरील भागात मध्यभागीच मोठे खड्डे पडल्याने पुन्हा एकदा सॅटीसवरील खड्डय़ांनी ठाणेकरांना ग्रासले आहे.
पावसाळ्यात शहरातील अनेक भागात खड्डय़ांचा विळखा असतो. त्याप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून सॅटीसवरही खड्डे पडतात, असा अनुभव आहे. या पुलावर दररोज मोठय़ा संख्येने ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसची ये-जा असते. तसेच या पुलावरूनच टीएमटी व बोरीवली, घोडबंदर आणि भाईंदरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसेसचे मार्गक्रमण होत असते. असे असताना या ठिकाणी वारंवार पडणाऱ्या खड्डयांकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष पाहून प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुलावरील फेरीवाल्यांविरोधात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या अतिक्रमण विरोधी पथकास या फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात अपयश आले आहे. अशातच जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. याप्रकरणी महापालिकेचे शहर अभियंता रतन अवसरमल यांच्याशी संपर्क साधला असता पावसाने उघडीप दिल्याने शहरातील सर्वच भागातील रस्ते बुजविण्याचे कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळा सहन करत आम्ही या बस थांब्यावर उभे असायचो, मात्र आच्छादनाचे काम पूर्ण झाल्याने मोठी गैरसोय टळली. आच्छादन असल्यामुळे येथे पावसाळी खड्डय़ांचा प्रश्नच नव्हता. मात्र हे कुठून आले हे कळायला मार्ग नाही.
– अल्का महाजन, प्रवासी.
आम्ही गेल्या महिन्यातच या खड्डय़ाबाबत महानगर पालिकेशी पत्रव्यवहार केला होता, मात्र पालिका प्रशासनाचे कोणतेही कर्मचारी येथे फिरकलेही नाही, दरवर्षी असेच खड्डे पडत असतात, त्यामुळे वाहन चालवताना कंबरेला लचक भरते. याचा फटका वृद्धापकाळी आम्हाला नक्कीच बसू शकतो.
– टीएमटी कर्मचारी.