लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानका जवळील बँक ऑफ महाराष्ट्र, हनुमान मंदिर ते म्हसोबा चौक या वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या अरुंद खड्डे पडलेल्या रस्त्यांवरुन वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. या रस्त्यावरुन वाहने संथगतीने चालविली जात असल्याने या रस्त्यावर खड्ड्यांमुळे कोंडी होते.
डोंबिवलीतून कल्याणला जाणारा मधला मार्ग म्हणून बहुतांशी वाहन चालक या रस्त्याचा उपयोग करतात. डोंबिवली शहरातून कल्याणला जाणारी आणि कल्याणहून येणारी वाहने ठाकुर्लीतील महाराष्ट्र बँक, हनुमान मंदिर रस्त्याचा उपयोग करतात. या सततच्या वर्दळीमुळे मुसळधार पावसाने या रस्त्यावर खड्डे पडले आहे. ठेकेदाराने गेल्या आठवड्यात या रस्त्याची डागडुजी केली होती. पावसामुळे खडी, माती धुऊन गेली आहे. शालेय बस, अवजड वाहन या रस्त्यावरुन जात असेल तर अभूतपूर्व वाहन कोंडी या रस्त्यावर होते.
आणखी वाचा-ठाण्यात खड्डे भरणीसाठी उपयुक्त ठरलेल्या मास्टिकचा तुटवडा
या रस्त्याच्या परिसरात शाळा, महाविद्यालये आहेत. ९० फूट रस्त्यावरील रहिवासी याच रस्त्याने येजा करतात. या कोंडीत शाळकरी मुलांचे सर्वाधिक हाल होतात. या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने आहेत. तेथे खरेदीसाठी आलेला ग्राहक रस्त्यावर वाहन उभे करुन खरेदीसाठी जातो. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. खडड्यांमुळे या ठिकाणी कोंडी होत असल्याने वाहतूक पोलीस याठिकाणी नियोजनासाठी नसतो.
ठाकुर्लीतील या वर्दळीच्या रस्त्याची दुर्दशा पाहून आयुक्तांनी तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत. गेल्या आठवड्यात शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी रस्त्यावर खड्डे दिसले तर त्याला संबंधित रस्ते कामाचा ठेकेदार आणि नियंत्रक अभियंता जबाबदार असेल असे जाहीर केले होते. मग ठाकुर्लीत एवढे खड्डे पडले आहेत. त्यांच्यावर प्रशासन कारवाई का करत नाहीत, असे प्रश्न नागरिक करत आहेत. पालिका अभियंत्याने मात्र खड्डे भरणाची कामे सुरू आहेत. पावसाचा अंदाज घेऊन खड्डे भरले जात आहेत, असे सांगितले.