कल्याण- कल्याण शहराचे मुंबई बाजूकडील मुख्य प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत. शहराच्या मुख्य प्रवेशव्दारावरील रस्त्यावर खड्डे पडून ते बुजविण्यात पालिका प्रशासन टंगळमंगळ करत असल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.कल्याण मधील बहुतांशी नागरिक सकाळ, संध्याकाळ दुर्गाडी किल्ला, गणेशघाट येथे दर्शनासाठी, फिरण्यासाठी येतात. त्यांना या खड्ड्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते. दुर्गाडी किल्ला रस्त्यावरुन शहाडकडून येणारी, शिळफाटा मार्गे, डोंबिवलीतून, कल्याणमधून येणारी वाहने एकाचवेळी मुंबई दिशेने जात असतात. नाशिक, मुंबईकडून कल्याण मध्ये दुर्गाडी किल्ला पुलावरुन शहरात येतात.
अवजड मालवाहू वाहन चालक, टँकर चालकांना दुर्गाडी किल्ला परिसरातील खड्ड्यांतून वाहने नेताना कसरत करावी लागते. शाळेच्या बस या रस्त्यांवरुन धावत असतात. किल्ल्याच्या बाजुला उर्दू शाळा आहे. शहराच्या विविध भागातील विद्यार्थी दुचाकी, रिक्षा, खासगी वाहनाने शाळेत येतात. त्यांनाही या खड्ड्यांचा त्रास होतो. पादचारी या रस्त्याच्या कडेने जात असेल तर वाहन जात असताना खड्ड्यातील पाणी अंगावर उडते, अशा पादचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.सुरुवातीला वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील खड्डे बुजविले. आता खड्ड्यांचे आकार मोठे झाल्याने या खडड्यांमध्ये खडी कोठून आणायची, असा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत वाहनांचे नियोजन वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे.
हेही वाचा >>>जैतापूर आणि नाणार या प्रकल्पांचा विरोध समजून घेणे आवश्यक; जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर
हेही वाचा >>>देशाबाबत वाईट गोष्टींना जास्त प्रसिद्धी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
पालिकेचे बहुतांशी अधिकारी याच रस्त्यावरुन दररोज येजा करतात. त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का, असे प्रश्न प्रवासी करतात. शहर अभियंत्यांनी खड्डे रस्त्यावर दिसले तर संबंधित रस्त्याचा ठेकेदार, नियंत्रक रस्त्याच्या अभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अद्याप एकाही ठेकेदार, अभियंत्यावर कारवाई होत नसल्याने ठेकेदार सुशेगात आणि अभियंते दालनात आरामात असल्याचे चित्र आहे. पालिकेकडून मात्र खड्डे भरण्याची कामे सर्व भागात सुरू आहेत, असे सांगितले जात आहे.