डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात उभारलेल्या एका बेकायदा बांधकामात भूमाफियांनी कोंबड्यांचा खुराडा (पोल्ट्री फार्म) सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वे स्थानकालगत कोंबड्यांचा खुराडा सुरू करण्यात आला तर प्रचंड दुर्गंधी रेल्वे स्थानक परिसरात पसरणार असल्याने रेल्वे प्रवाशांनी या खुराड्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोपर रेल्वे स्थानकालगत पश्चिम बाजूला दिवा रेल्वे स्थानक बाजूने हरितपट्ट्यातील हिरवीगर्द वनराई, पाणवनस्पती नष्ट करून कल्याण डोंबिवली पालिकेच्या कोणत्याही परवानग्या न घेता पवन पाटील या बांधकामधारकाच्या पुढाकाराने हे बेकायदा बांधकाम करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. रेल्वे स्थानकाजवळ कोंबड्यांचा खुराडा सुरू झाला तर तेथे त्यांचे खाद्यान्न, दररोजची विष्ठा बाजूलाच टाकण्यात येईल. ही सर्व दुर्गंधी रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासी, नागरिकांंना सहन करावी लागणार आहे. रेल्वे स्थानकाजवळ कोंंबड्यांचा खुराडा सुरू होतोय या विचारानेच प्रवाशांंनी विशेषता महिला प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – आधी संसदेत हनुमान चालिसा, आता थेट व्हिडीओ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून हनुमान जयंतीदिनी विशेष व्हिडीओ पोस्ट

कोंबड्यांच्या खुराड्यांना मुबलक पाणी लागते. त्यांची दररोजची विष्ठा खुराड्यातून बाहेर काढून लगतच्या खड्ड्यात किंवा मोकळ्या जागेत टाकावी लागते. या विष्ठेतून प्रचंड दुर्गंधी सुटते. त्यामुळे बहुतांशी कोंबड्यांचे खुराडे हे शहर, गावापासून दूर आणि जंंगल भागात असतात, असे एका जाणकाराने सांगितले. कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्यांच्या खुराड्यातून बाहेर पडणारा कचरा, विष्ठा ही जवळच्या हरितपट्ट्यावर टाकली जाण्याची शक्यता असल्याने बाजूला हरितपट्टाही नष्ट होण्याची शक्यता पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या बेकायदा बांधकामधारकाला नोटीस पाठवून रेल्वे स्थानकालगत कोंबड्यांचा खुराडा सुरू करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे. डोंबिवली शहरातील पालिकेचे राखीव भूखंड, उल्हास खाडीचा डोंंबिवली भागातील किनारा बेकायदा चाळी, इमारती बांधून भूमाफियांनी हडप केले आहेत. आता भूमाफियांनी कोपर रेल्वे स्थानकालगतची हरितपट्ट्याची जागा बांधकामे करून गिळंकृत करण्यास सुरूवात केल्याने पर्यावरणप्रेमींनी याविषयी राज्याच्या पर्यावरण विभाग, हरित लवादाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला चक्कर

पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कल्याण डोंबिवलीत हरितपट्टे विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. कोपरमध्ये मात्र कोंबड्यांच्या खुराड्यासाठी हरितपट्टा नष्ट करण्यात आला आहे. हा खुराडा जमीनदोस्त करण्याचे आदेश आयुक्त जाखड यांनी देण्याची मागणी कोपर रेल्वे स्थानक भागातील रहिवाशांनी केली आहे.

कोपर रेल्वे स्थानकाजवळ बेकायदा बांधकाम केलेल्या बांधकामधारकाला बांधकामाची कागदपत्रे सादर करण्यास कळविले आहे. सुनावणीनंतर बांधकाम बेकायदा असेल तर ते जमीनदोस्त केले जाईल. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

कोपर रेल्वे स्थानक भागात कोंबड्यांचा खुराडा सुरू करण्याचे भूमाफियांचे प्रयत्न आहेत. हा खुराडा सुरू होण्यापूर्वीच रेल्वे, पालिकेने तो जमीनदोस्त करावा, अन्यथा खुराड्यातील दुर्गंधीमुळे कोपर रेल्वे स्थानकातून प्रवाशांना प्रवास करणे मुश्किल होईल. – किरण गोकरणे, प्रवासी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poultry farm in green belt near kopar railway station near dombivli deep resentment among railway passengers ssb