१२ तास वीज खंडित झाल्याने रहिवाशांना प्रचंड मनस्ताप; पाणीपुरवठय़ावरही परिणाम
वीज वाहिनी खंडित झाल्याने बदलापूर शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला. रात्री उशिरा खंडित झालेला वीजपुरवठा दुपापर्यंत पूर्ववत झाला नव्हता. त्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठय़ावरही त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून आला.
बदलापूर पूर्वेतील कुळगाव, पाटीलपाडा, आनंद नगर, आदर्श शाळा आणि महाविद्यालय परिसराचा वीजपुरवठा रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास खंडित झाला. वीज वाहिनी खंडित झाल्याने पुरवठा खंडित झाल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, यासंबंधी ठोस माहिती देण्यास कुणीही पुढे येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. रात्री उशिरा खंडित झालेला पुरवठा सोमवारी पहाटेपर्यंत पूर्ववत झाला नाही. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काही भागात विजेचा पुरवठा पूर्ववत झाला मात्र काही वेळातच पुन्हा तो खंडित झाला. उच्च दाब असलेली वीज वाहिनी तुटल्याची माहिती वीज वितरण विभागकडून देण्यात आली. मात्र नागरिकांनी तक्रारीसाठी केलेल्या दूरध्वनीला समाधानकारक उत्तर देण्यात येत नव्हते. त्यामुळे संभ्रम आणि संतापाचे वातावरण होते. गेल्या महिनाभरापासून बदलापुरात पावसाळापूर्वीच्या कामांसाठी अनेकदा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. सातत्याने पुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा