बदलापूरः शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस येताच वीज गायब झाली. त्यामुळे बाहेर पाऊस आणि घरात नागरिक घामाघुम अशी परिस्थिती होती. त्यापूर्वी गुरूवारी मध्यरात्री दोन वेळा बदलापूर पश्चिमेतील बहुतांश भागात वीज गायब झाली होती. तर सकाळच्या सुमारासही वीजेचा लपंडाव पहायला मिळाला.
गेल्या काही वर्षात बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरांमध्ये नवनव्या गृहसंकुलांमुळे विजेचा वापर वाढला आहे. उदवाहने, वातानुकुूलित यंत्रणा, वाणिज्य कार्यालयांची संख्या वाढल्याने विजेच्यी मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत विजेचा पुरवठा मात्र जुन्याच प्रमाणात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विजेचा वापर वाढल्यास यंत्रणेवर ताण येतो. मे महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यानंतर विजेच्या मागणीत वाढ झाली होती. यंत्रणेवर भार वाढल्यामुळे अचानक वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर चक्राकार पद्धतीने वीजेचे नियोजन करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र जलक्षोभ पसरण्याच्या भीतीने महावितरणाने स्थानिक पातळीवरचा हा निर्णय घेतलाच नसल्याचे सांगत घुमजाव केले. विजेचा भार इतर वाहिन्यावर टाकून भार वाढून यंत्रणा ठप्प होणार नाही याबाबत काळजी घेतली. मात्र या सर्व गोंधळात महावितरणाने पावसाळीपूर्व तयारीसाठी विजपुरवठा बंद केला नाही.
हेही वाचा >>>डोंबिवलीत पाथर्ली नाक्यावरील विवाह मंडपाचा वाहतुकीला अडथळा, एक महिन्यापासून मंडप रस्त्यावर
त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची झाडे, फांद्या छाटणीची कामे, विजेच्या तारांना येणारे पावसाळ्यातील अडथळे दूर करण्याचे काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे पहिल्याच काही मिनिटाच्या पावसात बदलापुरातील विजपुरवठा खंडीत झाला होता. पश्चिमेतील बहुतांश भागात मध्यरात्री दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र घामाच्या धारांत काढावी लागली. त्यात पहाटेच्या काही मिनिटाच्या पावसात वीज गेल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण होते. सकाळच्या वेळी ज्या भागात पाणी पुरवठा होतो. त्या भागात पाणी पुरवठ्यावरही खंडीत वीज पुरवठ्याचा परिणाम झाला. पहिल्याच पावसात दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडीत झाल्याने पावसाळ्यात चार महिने काय होईल असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
हेही वाचा >>>भावली धरणाचे काम संथगतीने; पर्यावरण मंजुऱ्यांचा खोडा, ठाण्याचा ग्रामीण पट्टा तहानलेलाच
बदलापुरात सहा मिलीलीटर पाऊस
वातावरणातील बदलामुळे गुरूवारी काही अंशी तापमानात घट पाहायला मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी पहाटे अंदाजाप्रमाणे पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. बदलापुरात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.