वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झालेले असतानाच गुरुवारी रात्री ठाणे पूर्व विभागातील विजेच्या खेळखंडोब्याने नागरिकांची झोपच उडवली. शुक्रवारी पहाटेपर्यंत वीजपुरवठा अनियमित राहिल्याने परिसरातील अनेकांनी मोकळ्या हवेसाठी रस्त्यावर धाव घेतली.
ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी सायंकाळी दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता, तर गुरुवारी रात्री तब्बल दोन तास वीज गायब होती. त्यानंतर केवळ पंधरा मिनिटे वीज सुरू झाली आणि पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित होण्याचा हा प्रकार मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होता.
कोपरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीमध्ये बिघाड निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी मनुष्यबळ कमी असल्याने तात्काळ वीजपुरवठा जोडणे शक्य होत नव्हते. दुरुस्तीसाठी सात तासांहून अधिक काळ लागला. सकाळी चार वाजता परिसराला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, अशी माहिती महावितरणच्या भांडूप परिमंडळाच्या वतीने देण्यात आली.

Story img Loader