महापारेषणच्या पाल येथील उपकेंद्रात रविवारी दुपारी एक वाजता बिघाड झाल्याने कल्याण पूर्व आणि डोंबिवली शहराच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. दीड तास वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवासी हैराण झाले होते. महावितरणाच्या सेवासंपर्क क्रमांकावर सतत संपर्क करूनही तेथून कोणतेही उत्तर मिळत नसल्यामुळे वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त होत होता.
मुसळधार पाऊस, वारा नसताना वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवासी नाराजी व्यक्त करत होते. उन्हाचे चटके, घामाच्या धारा अद्याप सुरू आहेत. त्यामुळे थोडा वेळ घरातील पंखा, वातानुकुलित यंत्र बंद राहिली तरी रहिवासी अस्वस्थ होतात. विशेष करून घरातील लहान मुले, आजारी रुग्ण, वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होतो. रविवार सुट्टीच्या दिवशी वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप झाला. वीज पुरवठा खंडित होताच अनेक रहिवाशांनी महावितरणच्या सेवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. तेथील मोबाईलही सतत व्यस्त लागत होता.
अनेक रहिवाशांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये जाऊन विचारणा केली. त्यावेळी पाल येथील उपकेंद्रात बिघाड झाला आहे, अशी उत्तरे देण्यात आली. सेवा संपर्क क्रमांक व्यस्त का ठेवण्यात येतो. आणि रिंग वाजली तरी ग्राहकांना प्रतिसाद का दिला जात नाही, अशी विचारणा अनेक ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना केली. अनेक फोन येत असल्यामुळे मोबाईल व्यस्त राहतो, अशी कारणे कर्मचारी देत होते.
रविवार असल्याने अनेक कर्मचारी घरातून कार्यालयीन काम करत असतात. त्यांचीही वीज पुरवठा खंडित झाल्याने अडचण झाली. दुपारी एक वाजता खंडित झालेला वीज पुरवठा अडीच वाजता सुरू झाला. कल्याण पश्चिम भागात अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. घरातून कार्यालयातून काम करणाऱ्या, बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांची सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच महावितरणच्या कल्याणमधील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास सांगितले. तसेच कल्याणमधील विजेचा लपंडाव लवकर बंद करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी आहे.
पाल येथील उपकेंद्रात बिघाड झाल्याने कल्याण पूर्वेचा काही भाग आणि डोंबिवलीतील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता, अशी माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे जनसंपर्क अधिकारी विजय दुधभाते यांनी दिली.