वीजपुरवठा सातत्याने खंडीत; रहिवाशांना उकाडय़ाचा त्रास
बदलापूर पूर्वेकडील संपूर्ण कात्रप आणि शिरगांव या मोठय़ा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या उकाडय़ात दिवसांत सलग काही तास विजेचा पुरवठा खंडीत होत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
बदलापुरातील कात्रप परिसर, डी. पी. रोड, मुझुमदार मार्ग, शिरगांव या परिसरातील नागरिक गेल्या काही महिन्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने हैराण झाले आहेत. रात्री-अपरात्री सातत्याने हा प्रकार होत असल्याने नागरिकांकडून महावितरणाच्या कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विजेचा पुरवठा खंडीत होताच त्याचे कारण काय, तो पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत माहिती घेण्यासाठी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा तर तेथून काहीही प्रतिसाद मिळत नाही, असा रहिवाशांचा अनुभव आहे. पावसाळ्यापासून गेल्या काही महिन्यांत अनेकवेळा झाड कोसळल्याने तर कधी वीज वाहक तार तुटल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत. महावितरणच्या वीज तारेवरील कंडक्टरला अनेक अनावश्यक जोड लावण्यात आले असून सदर कंडक्टर तातडीने बदलण्याची आवश्यकता आहे. या वीज तार कंडक्टरवर असणारी झाडे व फांद्या छाटण्याची आवश्यकता आहे. याबाबत पावसाळ्यापूर्वीच कार्यवाही होणे आवश्यक होते. परंतु सदर काम न केल्यामुळे या पावसाळ्यात झाडे व झाडांच्या फांद्या कंडक्टवर पडून शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी महावितरणने दर शुक्रवारी पाच ते सहा तासांसाठी वीज पुरवठा खंडीत ठेवला होता. त्यात संपूर्ण शहरातील दुरूस्तीची कामे करण्यात आल्याचा दावा तेव्हा महावितरणकडून करण्यात आला होता. मात्र, पावसाळ्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडले होते. मात्र, पावसानंतरही वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सदर भागातील कंडक्टर आम्ही बदलत असून नागरिकांना इथून पुढे त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत असे महावितरणचे बदलापूर पूर्वचे उप-कार्यकारी अभियंता अशोक ईश्वरे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
विजेच्या लपंडावाने बदलापूरकर हैराण
रात्री-अपरात्री सातत्याने हा प्रकार होत असल्याने नागरिकांकडून महावितरणाच्या कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Written by रत्नाकर पवार
Updated:

First published on: 27-10-2015 at 00:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power short in badlapur