शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने शिंदे गटाकडून खारकर आळी येथील दिघे यांच्या स्मृतिस्थळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून, ते कार्यक्रमस्थळी येण्याआधी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांसह स्मृतिस्थळी येऊन दर्शन घेऊन निघून गेले. या निमित्ताने ठाकरे गटाने या ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला असला तरी शिंदे यांच्या उपस्थितीआधी त्यांनी दर्शन घेतल्याने दोन्ही गट आमने सामने येण्याचा प्रसंग टळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आनंद दिघेंचे पंख छाटण्याचं काम झालं”, नरेश मस्केंचं विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या स्वागताला…”

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती असून यानिमित्ताने शिंदे गटाने खारकर आळी येथील दिघे यांच्या स्मृतीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिघे यांच्या जयंतीच्या एक दिवसाआधी ठाकरे गटाने ठाण्यात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे गटाने शक्तिप्रदर्शन केले होते. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक शहरात पहिल्यांदा लावले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात होणाऱ्या दिघे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे महत्व वाढले असून, या कार्यक्रमानिमित्ताने शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे समजते. या स्मृतिस्थळी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही दर्शनासाठी येणार असल्याने दोन्ही गट आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात होती.

हेही वाचा – आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार?

दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री शिंदे हे आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी येणार आहेत. परंतु, त्यांच्या येण्याच्या अर्धा तास आधी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांसह स्मृतिस्थळी येऊन दर्शन घेऊन निघून गेले. या निमित्ताने ठाकरे गटाने याठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिंदे यांच्या उपस्थितीआधी त्यांनी दर्शन घेतल्याने दोन्ही गट आमने सामने येण्याचा प्रसंग टळला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power show by thackeray group at anand dighe memorial site ssb