लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील रामनगर, राजाजी रस्ता, म्हात्रे नगर, टंडन रस्ता मागील काही महिन्यांपासून दररोज एक ते दोन तास वीज पुरवठा खंडित होतो. या भागाला यापू्वी होणारा वीज प्रवाह आयरे भागातील बेकायदा इमारती, चाळींसाठी खेचण्यात आला आहे. त्याचा परिणाम राजाजी रस्ता, म्हात्रेनगर भागावर होत आहे. दररोज एक ते दोन तास कधी तर त्याहून अधिक वेळ वीज प्रवाह बंद राहत असल्याने रहिवासी हैराण आहेत. महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये या खंडित वीज पुरवठ्यासंबंधी तक्रार करुन काही उपयोग होत नसल्याने म्हात्रेनगर प्रभागाचे माजी नगरसेवक विशू पेडणेकर यांनी यासंदर्भात उर्जा मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
राजाजी रस्ता, रामनगर, टंडन रस्ता, राज पार्क, म्हात्रेनगर, मढवी शाळा परिसर हा मध्यवर्गीय वस्तीचा भाग आहे. या भागात शाळा, रुग्णालये, व्यापारी पेठ आहे. यापूर्वी या परिसराला वस्तीप्रमाणे वीज पुरवठा होत होता. मागील दोन वर्षात आयरे गाव परिसरात ३० हून अधिक बेकायदा इमारती, दोन ते तीन हजार बेकायदा चाळी भूमाफिांनी उभारल्या. या वाढत्या वस्तीला भूमाफियांनी महावितरण अभियंत्यांशी संगनमत करुन राजाजी रस्ता, रामनगर भागातून वीज प्रवाह घेतला. या वाढत्या वस्तीमधील वीज वापराचा भार म्हात्रेनगर, रामनगर प्रभागात येऊ लागला. त्यामुळे या भागाचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे, असे माजी नगरसेवक विशू पेडणेकर यांनी सांगितले.
हेही वाचा… कल्याणमधील आ. गणपत गायकवाड यांची समाज माध्यमातून बदनामी करणारा अटकेत
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर सर्व यंत्रणा ठप्प होते. रुग्णालय, घरातील ज्येष्ठ, वृध्द, लहान बाळांचे सर्वाधिक हाल होतात. शाळा, प्रयोगशाळांमधील काम ठप्प होते. राजाजी रस्ता, म्हात्रेनगर भागातील वीज पुरवठा स्वतंत्र ठेऊन आयरे गाव भागासाठी स्वतंत्र रोहित्र बसवा. तेथून त्यांना वीज पुरवठा द्या, अशी मागणी अनेक वेळा महावितरणकडे केली. त्याची दखल घेण्यात येत नाही, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.
ग प्रभाग हद्दीतील आयरे गाव प्रभागात १४ टोलेजंग इमारती उभ्या आहेत. नवीन ३२ बेकायदा इमारतींची आखणी माफियांनी केली आहे. चार हजार बेकायदा चाळी आयरे गाव परिसरात आहेत. या भागातील तलाव बुजवून काही चाळींची बांधणी केली आहे. वळण रस्त्याचा प्रस्तावित मार्ग या चाळींमुळे बंद झाला आहे. या बेकायदा बांधकामांवर पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत ग प्रभागाचे माजी साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी वेळकाढूपणा केल्याच्या तक्रारी आयरेतील नागरिकांनी केल्या आहेत. या बेकायदा बांधकामांमधील २४ बेकायदा इमारतींना भूमाफियांनी राजाजी रस्ता, म्हात्रेनगर भागातून वीज प्रवाह घेतला आहे.
हेही वाचा… कल्याण: शिळफाटा रस्त्यावरील गतिरोधक हटविल्याने वाहने सुसाट
महावितरण अधिकाऱ्यांनी त्याला साथ दिली. या वाढीव वीज भाराचा फटका नियमित वीज देयक भरणा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे, असे पेडणेकर यांनी सांगितले. वीज पुरवठा खंडित झाला की महावितरणचे कर्मचारी तात्पुरती जोडणी जुळवून तो पूर्ववत करतात. हे नेहमीचे नाटक आहे. कायमस्वरुपी उपाययोजना अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने आपण उर्जामंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे, असे पेडणेकर म्हणाले.
सर्व प्रभागांमध्ये बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू असताना ग प्रभाग हद्दीतील आयरे भागातील बेकायदा इमारती, चाळींवर साहाय्यक आयुक्त का कारवाई करत नाहीत. याची चौकशी करुन संबंधित अधिकारी, कारवाई पथकावर कारवाई करण्याची मागणी आयरचे रहिवासी तानाजी केणे, अंकुश केणे यांनी केली आहे.
हेही वाचा… मुंबईत विश्रांती, ठाण्यात रिपरिप
महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले, केळकर रस्ता येथे भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. संकेत इमारत ते म्हात्रेनगर रोहित्र पर्यंत ८०० मीटर उच्च दाबाची वीज वाहिनी टाकण्याचे काम यात अंतर्भूत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मिटेल.