उल्हासनगर : उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. रुग्णालयातील अंतर्गत वीज वहनातील तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जनरेटर पुरवठादार ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्यानें हा प्रकार घडल्याचे कळते आहे.

उल्हासनगरमध्ये राज्य शासनाचे शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया आणि अन्य अनेक आरोग्यसेवा असून आसपासच्या शहरांमधून दररोज किमान २०० रुग्ण इथे दाखल असतात. मात्र या रुग्णालयात मंगळवारी सकाळी ११ वाजतापासून वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणाकडून रुग्णालयाला केला जाणारा पुरवठा सुरळीत होता. मात्र रुग्णालयातील अंतर्गत वीज वहन यंत्रणा सकाळच्या सुमारास ठप्प झाली. त्यानंतर पर्यायी विद्युत यंत्रणा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ती यंत्रणा सुरू होऊ शकली नाही. परिणामी महावितरणकडून वीजपुरवठा सुरू असूनही अंतर्गत यंत्रणेमुळे रुग्णालयातील वीज गायब झाली.

उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालय

सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णालयातील वीजपुरवठा ठप्प होता. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंत रुग्णालयात वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता. परिणामी सर्वच आरोग्यसेवा खोळंबून पडली होती. रात्री साडेसातच्या सुमारास दुरुस्तीनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र तोपर्यंत रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांची नातेवाईक मेटाकुटीला आले होते. रुग्णालय प्रशासनावर नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात होता. रुग्णालय प्रशासनाचा हा बेजवाबदारपणा रुग्णांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होते आहे.

या विभागाला फटका

क्ष किरण, डायलिसिस, प्रसूती विभाग, नवजात बालक काळजी विभाग, सोनोग्राफी, रक्त पेढी विभाग, सिटी स्कॅन विभाग या विभागातील कामकाजावर या खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम झाला. या विभागातील रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.