डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर, गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागाचा वीज पुरवठा मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होता. हा बंद वीज पुरवठा सुरू करण्याचे महावितरण अभियंत्यांचे रात्रीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर दहा तासाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता वीज पुरवठा पूर्ववत झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली पश्चिमेतील महावितरणच्या बहुतांशी वीज वाहिन्या जुनाट झाल्या आहेत. बहुतांशी शहरांमधील खांबांवरील वीज पुरवठा देण्याची पद्धत महावितरणने बंद केली आहे. डोंबिवलीत अद्याप खाबांवरील वीज पुरवठा बंद करून या वीज वाहिन्या जमिनीखालून नेण्यात येत नसल्याने जिवंत वीज वाहिन्यांना कार्बड पकडणे, वीज प्रवाह सुरू असताना त्या वाहिनीला एखादा पक्षी चिकटणे, झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांना लागून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचा फटका इतर आठ महिन्यांपेक्षा पाऊस सुरू झाला की अधिक प्रमाणात बसतो. पाऊस सुरू झाल्यापासून डोंबिवली, कल्याण शहराच्या अनेक भागांमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. अगोदरच उकाड्याने नागरिक हैराण आहेत. त्यात वीज पुरवठा गेला की नागरिकांचा संताप अनावर होत आहे.

हेही वाचा – ठाण्यातील उंच इमारतीतील सदनिकेत आग, कुटुंबियांना वाचविताना एकाचा मृत्यू

डोंबिवली पश्चिमेत मंगळवारी रात्री बारा वाजता वीज वाहिनीत बिघाड झाला. या बिघाडाचा फटका उमेशनगर, गरीबाचापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर, नवापाडा परिसराला बसला. महावितरणचे साहाय्यक अभियंता संजय यादव आणि त्यांचे सहकारी रात्रीपासून विभागवार बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत करत होते. सुरळीत केलेला वीज पुरवठा तांत्रिक कारणाने पुन्हा बंद होत होता. त्यामुळे अभियंत्यांची दमछाक होत होती.
अखेर देवीचापाडा येथे सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी या भागात नवीन रोहित्र बसविण्याचा निर्णय अधिकाऱ्यांंनी घेतला. हे काम रात्री दोन वाजल्यापासून ते बुधवारी सकाळीपर्यंत सुरू होते. साडेदहा वाजता देवीचापाडा, महाराष्ट्रनगर परिसराचा वीज पुरवठा सुरळीत झाला.

पाऊस सुरू झाला असला तरी उकाडा कायम आहे. त्यामुळे वीज पुरवठ्यात व्यत्य येणार नाही याची काळजी घेण्याचे महावितरणच्या वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यामुळे स्थानिक अधिकारी वीज पुरवठा खंडित झाला की तातडीने घटनास्थळी हजर होऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील खांबांवरील वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी आता वीज ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत आजदे गावात रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी, परिसरातील रहिवाशांचे येण्या-जाण्याचे मार्ग बंद

नागरिकांचे हाल

देवीचापाडा भागाचा वीज पुरवठा रात्री बारा वाजता खंडित झाला. रात्रभर वीज पुरवठा बंद राहिल्याने उकाड्याने नागरिकांचे हाल झाले. काही नोकरदार विदेशातील कंपन्या, बँका आणि इतर कार्यालयांमध्ये भारतात राहून कामे करतात. असे नोकरदार डोंबिवलीत अधिक संख्येने आहेत. त्यांचे बंद वीज पुरवठ्याने हाल झाले.

तांत्रिक कारणामुळे डोंबिवली पश्चिमेतील काही भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. विभागवार हा वीज पुरवठा रात्रीच पूर्ववत करण्यात आला. काही ठिकाणी वारंंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तेथे रोहित्र बसविण्याचा निर्णय घेऊन त्या भागाला कायम वीज पुरवठा राहिल अशी व्यवस्था केली आहे. – संजय यादव, साहाय्यक अभियंंता, महावितरण, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power supply to dombivli west off for ten hours ssb
Show comments