डोंबिवली : अति महत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली पश्चिम येथील काही भागाचा वीज पुरवठा सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे महावितरणच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर केले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील २२ केव्ही आनंंदनगर स्वीचिंग स्टेशन या उपकेंद्रावरील २२ केव्ही सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील फिडरचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
२२ केव्ही सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील फिडरवरून डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी, भागशाळा मैदान परिसर, पु. भा. भावे सभागृह, म्हात्रेवाडी, महात्मा गांधी रस्ता, रेतीभवन, आगरी सभागृह, अंबिकानगर परिसराला वीज पुरवठा केला जातो. या फिडरवर दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने या परिसराचा वीज पुरवठा सकाळी नऊ ते दुपारी एक या कालावधीत बंद असणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
चटका देणारे उन, उन्हाच्या गरम झळा अशा परिस्थितीत वीज पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. घरात वीज नसल्याने पंखा, वातानुकूलित यंत्रणा, शीतकपाटे बंद राहणार आहेत. अनेक नोकरदार अलीकडे घरातून कार्यालयीन कामे करतात. त्यांना या वीज बंदचा फटका बसणार आहे.