डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथे ‘डी फिटनेस क्लब’ च्या जीम चालकाने मीटरमध्ये तांत्रिक बदल करून नऊ लाख रुपयांची वीजचोरी केली आहे. महावितरणच्या पथकाने ही चोरी उघडकीस आणली. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जागेचा मालक, चालकाविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या कल्याण पूर्व नांदिवली शाखेअंतर्गत हा भाग येतो. रघु पुजारी (चालक), हेमंत पाटील (मालक) गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. देसलेपाड्यातील वरद विनायक रेसिडेन्सीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘डी फिटनेस क्लब’ आहे. या जिमच्या वीजपुरवठ्याची तपासणी महावितरणच्या पथकाने केली. मीटरकडे येणाऱ्या केबलला लाकडी फळीच्या पाठीमागील बाजुने दुसरी केबल जोडून जिमसाठी परस्पर वीजवापर सुरू असल्याचे पथकाच्या तपासणीत आढळून आले.

गेल्या १४ महिन्यात जिमसाठी ९ लाख ६ हजार २२० रुपयांची ४७ हजार १५८ युनिट वीज चोरी करण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात पुजारी, पाटील यांच्याविरुद्ध वीजचोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.कल्याण पूर्व विभागांतर्गत एप्रिल २०२२ पासून ३३ लाख ६१ हजार रुपयांच्या ७१ वीजचोऱ्या उघडकीस आणण्यात आल्या आहेत. यामध्ये हेमंत दरे, सुरेश शेट्टी यांच्या अनुक्रमे २ लाख ४० हजार व ८४ हजार रुपयांच्या वीजचोरीचा समावेश आहे.

कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता पद्माकर हटकर, साहाय्यक अभियंते रविंद्र नाहिदे, योगेश मनोरे, प्रशांत राऊत, वर्षा भांगरे, प्रधान तंत्रज्ञ जगदीश धमक, तंत्रज्ञ गणेश अहिर, राजेंद्र करनवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader